टोळक्याचा हल्ला, चार जण ताब्यात
डोंबिवली \ शंकर जाधव : डोंबिवलीजवळील घारीवली परिसरात मंगळवारी रात्री घडलेल्या निर्घृण हत्याकांडाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक राहुल जाधव यांच्या वडिलांची लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घारीवली येथील जाधववाडी परिसरात ही घटना घडली. राहुल जाधव यांचे भाऊ दिनेश जाधव यांना काही तरुणांनी फोन करून बोलावून घेतले. दिनेश घटनास्थळी पोहोचताच १० ते १५ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला चढविला.
हा वाद सोडवण्यासाठी गेलेले त्यांचे वडील बामा जाधव यांच्यावरही आरोपींनी लोखंडी रॉडने बेछूट मारहाण केली. या गंभीर मारहाणीत बामा जाधव यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन महिलांसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासात मयूर पाटील आणि विनोद नावाच्या व्यक्तींचा या हल्ल्यात सहभाग असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, ही हत्या नेमकी कोणत्या कारणावरून झाली आणि वादाची पार्श्वभूमी काय होती, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे घारीवली परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
