जळगाव: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात बुधवारी, २५ जून रोजी हृदयद्रावक घटना घडली असून, सुपडू भादू पाटील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक रवींद्र भरत महाले (वय ४१) यांनी आपल्या वर्गातच गळफास घेत आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, मधली सुट्टी संपल्यानंतर विद्यार्थी वर्गात परतले असता त्यांना शिक्षक महाले हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. हा प्रकार कळताच शाळेत एकच खळबळ उडाली आणि शिक्षकांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. रवींद्र महाले हे पाचोरा तालुक्यातील दहीगाव संत येथे कुटुंबासह राहात होते. त्यांनी नेमके कोणत्या कारणास्तव हे पाऊल उचलले याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी प्राथमिक तपासात मानसिक तणावामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून अधिक तपास सुरू असून, शिक्षकांच्या आत्महत्येमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, शिक्षण क्षेत्रातील सहकाऱ्यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करून मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.
.jpeg)