मिरॅकल कंपनीमधील "त्या" कामगारांना न्याय देणार




कामगारमंत्री आकाश फुंडकर यांचे आश्वासन

माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकार 

कल्याण \ शंकर जाधव : अंबरनाथच्या मिरॅकल कंपनीतील त्या २५९ अन्यायग्रस्त कामगारांना आम्ही नक्कीच न्याय देऊ असे आश्वासन राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी बुधवारी दिले. भाजपचे माजी आमदार आणि महाराष्ट्र परिश्रम कामगार संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने मुंबईत ही बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये कामगार मंत्री फुंडकर यांनी कंपनी व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारावर ताशेरे ओढत या बैठकीबाबत पूर्वसूचना देऊनही  कंपनी मालक त्याला अनुपस्थित राहिल्याबद्दल संताप व्यक्त केला. 

अंबरनाथमधील मिरॅकल केबल कंपनीने बेकायदेशीरपणे काढून टाकलेल्या २५९ कामगारांना पुन्हा कामावर घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र परिश्रम संघ या कामगार संघटनेतर्फे गेल्या काही महिन्यांपासून कायदेशीर लढा सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज कामगार मंत्र्यांच्या प्रमूख उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक आज पार पडली. 

अंबरनाथच्या या मिरॅकल केबल कंपनी व्यवस्थापनाने गार्डनिंग, पॅकेजिंग आणि हाउस क्लिनिंगच्या नावाखाली अडीचशेहून अधिक कामगारांची भरती केली. आणि या कामगारांकडून कंपनीतील मुख्य स्वरूपाचे काम करून घेतले जात होते. तसेच किमान वेतन, आरोग्य विमा, भविष्य निर्वाह निधी असे कामगार कायद्यातील कोणतेही फायदे या कर्मचाऱ्यांना दिले जात नव्हते. एकप्रकारे या कंपनी व्यवस्थापनाकडून या कामगारांची अन्यायकारक पिवळणूक केली जात असल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कामगार मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले, तसेच कंपनी व्यवस्थापनाची ही चोरी पकडली गेल्यानंतर या २५९ कामगारांना अन्यायकारक पद्धतीने तडकाफडकी कामावरून काढून टाकण्यात आले असून त्याविरोधात गेल्या ३ महिन्यांपासून लढा सुरू असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले. 

हे सर्व म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी कंपनी व्यवस्थापनाच्या प्रतिनिधीला चांगलेच फैलावर घेतले. आजच्या बैठकीची माहिती असूनही मालक याठिकाणी उपस्थित का राहिले नाहीत असा संतप्त सवाल केला. त्यावर  आजारपणाचे कारण पुढे करत कंपनीमालक या बैठकीला उपस्थित राहिले नसल्याचे या प्रतिनिधीद्वारे सांगण्यात आले. तसेच पुढच्या बैठकीला जर कंपनी मालक उपस्थित राहिले पाहिजेत. ते आले नाहीत तर आम्हाला कायदेशीर मार्गाने हिसका दाखवावा लागेल अशी तंबीही कामगार मंत्री फुंडकर यांनी कंपनी व्यवस्थापनाच्या प्रतिनिधीला दिली. तर या बैठकीला उपस्थित असलेल्या अंबरनाथ मॅन्यूफॅक्चरिंगचे असोसिएशनचे अध्यक्षही कंपनी प्रतिनिधीसोबत उपस्थित होते. परंतु या बैठकीशी तुमचा कोणताही संबंध नसल्याचे सांगत कामगार मंत्र्यांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आणि या अन्यायग्रस्त कामगारांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून त्यांना नक्कीच न्याय मिळवून देण्यात येईल असे आश्वासन यावेळी कामगार राज्यमंत्री आकाश चौधरी यांनी दिले असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली. या बैठकीला भाजप प्रदेश महामंत्री आमदार विक्रांत पाटील, महाराष्ट्र परिश्रम संघ सचिव दिलीप कुमार मुंढे हेदेखील उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post