डोंबिवलीत रिक्षाचालकाची आत्महत्या


डोंबिवली \ शंकर जाधव : मोठा गाव परिसरात रिक्षा आणि कारमध्ये धडक झाल्यानंतर ७० वर्षीय रिक्षाचालक मुंजाजी शेळके यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपघातानंतर कारचालकाने रिक्षाचालकाला डांबून ठेऊन दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. यामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या शेळके यांनी अखेर गळफास लावून आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मोठा गाव परिसरात अपघात झाल्यानंतर संबंधित कारचालकाने शेळके यांना मारहाण करून सुमारे रात्री ३ वाजेपर्यंत डांबून ठेवले. त्यांची सुटका झाल्यानंतर शेळके आपल्या घरी परतले. मात्र दोन लाख रुपयांची भरपाई देण्याच्या दबावामुळे ते प्रचंड तणावाखाली होते. “दोन लाख द्यायचे कुठून?” अशी वेदना बोलून दाखवत अखेर त्यांनी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.



या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी डोंबिवलीतील विष्णु नगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. “जोपर्यंत आरोपींविरुद्ध योग्य गुन्हा दाखल करून अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,” असा इशारा नातेवाईकांनी दिला. त्यासोबतच अनेक रिक्षाचालकांनी आणि कुटुंबीयांनी विष्णु नगर पोलीस ठाण्यात गर्दी केली असून पोलिसांकडून योग्य चौकशी करून न्याय देण्याची मागणी केली जात आहे.

विष्णु नगर पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, लवकरच आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.





Post a Comment

Previous Post Next Post