डोंबिवलीकरांचा उदंड प्रतिसाद
डोंबिवली \ शंकर जाधव : भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धात अनेक शूर सैनिक आपले प्राण पणाला लावून आपल्या देशाकरिता लढले. त्यापैकीच एक म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील मूळचे पनवेल येथील लेफ्टनंट कर्नल श्रीराम गाडगीळ. डोंबिवलीतील रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटी आणि टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ततारखेला गणेश मंदिर संस्थान यांच्या वक्रतुंड सभाङगृहात लेफ्टनंट कर्नल श्रीराम गाडगीळ यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्नल गाडगीळ यांनी कारगिल युद्धातील त्यांच्या कामगिरीचे अत्यंत रोमांचक अनुभव सांगितले.
कर्नल गाडगीळ यांनी लष्करात जाण्याच्या प्रेरणेबद्दल सांगताना पनवेल येथील रसायनी येथे शाळेत शिक्षण घेत असताना त्यांच्या शिक्षकांकडूनच याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. पुढे लष्करात दाखल होण्यासाठी असलेल्या परीक्षा आणि प्रक्रिया या मध्ये मोठ्या शहरांपासून दूर रहात असल्यामुळे त्याकाळी येणाऱ्या अडचणी देखील त्यांनी सांगितल्या. या सगळ्या वर मात करून कर्नल यांची कारगिल युद्धाच्या केवळ एक वर्ष अगोदर नेमणूक करण्यात आली होती. जेव्हा युद्ध सुरू होणार होते तेव्हा कर्नल गाडगीळ हे सुट्टीवर होते आणि त्यांना तातडीने बोलावून घेण्यात आले. युद्ध सुरू असताना लष्करातील कोणालाच घरी बसवत नाही असे कर्नल गाडगीळ यांनी सांगितले.
कारगिल युद्धाच्या काळात केलेल्या कामगिरीचे विश्लेषण करताना कर्नल गाडगीळ यांनी त्याला तीन टप्प्यात विभागून सांगितले. पहिल्या टप्प्यात लेह-कारगिल हायवे उध्वस्त करणे हे शत्रूचे ध्येय असल्याने त्या हायवे चे संरक्षण करणे आणि शत्रूला तिथे घुसू न देणे ही जबाबदारी कर्नल गाडगीळ आणि त्यांच्या सहकऱ्यांकडे सोपवण्यात आली. याच्या यशस्वी पूर्तते नंतर दुसऱ्या टप्प्यात त्याच हायवे पासून पुढे असणाऱ्या मुश्कोह नाल्यावर असलेल्या जॅक रीफ नावाच्या पुलाचे शत्रूपासून संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली. हा पूल भारतीय सैन्याच्या वाहतुकीच्या आणि संपर्क ठेवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. ह्या दोन्ही टप्प्यातील कामगिरीच्या यशस्वी पूर्ततेनंतर कर्नल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सीमेलगत असणाऱ्या एका उंच टेकडीवर जाऊन पोस्ट उभारण्याची जबाबदारी देण्यात आली. सुमारे १६०००-१७००० फूट उंचीवर असलेली ही टेकडी एखाद्या सुळक्याप्रमाणे आहे. अतिशय तीव्र चढ असणारी आणि अतिशय कमी सखल भाग असून सीमेलगत असल्याने या टेकडीवरून मोठ्या सीमाप्रदेशावर लक्ष ठेवणे शक्य होणार होते. त्यामुळेच ह्या टेकडीवर शत्रूचे सैन्य पोहचायच्या आत आपण पोहचून ती सुरक्षित करणे आवश्यक होते.
कर्नल गाडगीळ आणि त्यांच्या सोबत १३ जवानांची तुकडी यांनी ही टेकडी चढण्यास सुरुवात केली. पाऊस, बर्फ, वादळी वारे, ढग, अत्यंत कमी दृश्यमानता अशा अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करत ही चढाई सुरू होती. वाटेत विखुरलेल्या पद्धतीने जागोजागी असलेल्या असंख्य भूसुरुंगांना चकवत कोणतीही मनुष्य हानी अथवा दुखापत न होता ही चढाई सुरू होती. या संकटांसोबतच शत्रूकडून सतत होत असलेला गोळीबार, तोफांचा मारा ह्या पासून देखील स्वतःचा बचाव सुरू होता. एखादी तोफ त्या सुळक्यावर डागली गेली की होणारा दगडांचा वर्षाव, भूस्खलन याने ही चढाई आणखीनच कठीण होत होती. परंतु कर्नल गाडगीळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपले प्राण पणाला लावून, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि देशप्रेम याच्या जोरावर ही मोहीम यशस्वी केली आणि मुश्कोह येथील या टेकडीवर भारताचा तिरंगा फडकला.
या अतिशय कठीण आणि मोक्याच्या जागेवर शत्रूच्या आधी आणि मोजक्याच सैन्याच्या साहाय्याने केलेल्या कर्नल गाडगीळ यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव म्हणून या ठिकाणास “RCGadgil” किंवा “गाडगीळ पॉइंट” असे नाव भारतीय लष्कराकडून देण्यात आले. कर्नल गाडगीळ यांच्या कडून हा थरार ऐकताना उपस्थितांना खरोखरच तो रोमांच अनुभवता आला.
कारगिल येथील कामगिरीनंतर कर्नल गाडगीळ यांना संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर पंजाब सीमेवर शत्रूच्या कारवायांना आणि अतिक्रमणांना रोखण्यासाठी तैनात करण्यात आले होते. तेथेही त्यांनी लष्करी शिस्त आणि प्रणाली यांच्या उत्तम अमलबजावणीने भारतीय भूभागात पाकिस्तानी सैन्या कडून लावण्यात आलेल्या असंख्य भूसुरुंगांना निकामी करण्याची कामगिरी यशस्वी केली. दरम्यान बेळगाव येथे सैनिकांना देण्यात येणाऱ्या कमांडो प्रशिक्षणा दरम्यान सुमारे ३५ फूट उंचीवरून जमिनीवर आदळल्याने कर्नल गाडगीळ यांना मणक्याची दुखापत झाली. अर्थात ह्या दुखापतीचा त्रास पंजाब येथील कामगिरी पूर्ण केल्या नंतर काही वर्षांनी उद्भवला. त्यामुळे पंजाब येथील मोहिमेत देखील मी सहभागी होऊ शकल्याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.
ऑपरेशन सिंदूर बद्दल बोलताना भारताने पाकिस्तानी आणि आतंकवादी कारवायांचे चोख प्रत्युत्तर दिले असून पाकिस्तान आणि आतंकवादी संघटना यांना या हल्ल्यामुळे मोठा हादरा बसला असून प्रचंड नुकसान देखील झाले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आजच्या काळात कोणतेच शहर हे युद्धभूमीपासून दूर राहिले नसून युद्धकाळात सर्वच नागरिकांनी सतर्क राहून सरकारकडून करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन केले पाहिजे असे सांगितले.
सध्या पुणे येथे स्थायिक असलेल्या कर्नल गाडगीळ यांनी कॉर्पोरेट जगतात पुढील काळ व्यतीत करण्याचे ठरवले असल्याचे सांगितले. सैन्यतुन निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या आणि जवानांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग होण्याच्या दृष्टीने विविध कंपन्यांनी पुढाकार घेतला पाहिजे असेही त्यांनी सुचवले.
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटीचे सचिव आशिष देशपांडे यांनी कर्नल गाडगीळ यांची मुलाखत घेतली, मयुरेश गद्रे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्या केतकी देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.