तीन प्रमुख बस मार्गांवरील थांब्यांचा तपशील प्रसिद्ध


उल्हासनगर महापालिका परिवहनचा उपक्रम


उल्हासनगर \ प्रतिनिधी : उल्हासनगर महानगरपालिका परिवहन उपक्रमांतर्गत सध्या कार्यरत असलेल्या तीन प्रमुख बस मार्गांवरील थांब्यांचा तपशील महापालिकेने नागरिकांच्या माहितीसाठी अधिकृतपणे प्रसिद्ध केला आहे. नागरिकांना दररोजच्या प्रवासासाठी सहज, सुरक्षित आणि सुलभ सेवा मिळावी, या उद्देशाने ही माहिती देण्यात आली आहे. सध्या कार्यरत असलेल्या बस क्र. १०१, १०२ आणि ए-२०१ या तीन बसमार्गांचा थांब्यांसह सविस्तर तपशील देण्यात आला आहे.


बस क्रमांक १०१ ही बस उल्हासनगर कॅम्प १ येथून सुरू होऊन शहाड, पिसवली, चंबारळी मार्गे बदलापूर रेल्वे स्थानक (पूर्व) येथे पोहोचणार. या मार्गावर बिर्ला कॉलेज, शहाड फाटा, एमआयडीसी परिसर अशा महत्त्वाच्या ठिकाणांवर थांबे असणार आहेत.


बस क्रमांक १०२ ही सेवा उल्हासनगर रेल्वे स्थानक (कॅम्प ५) पासून सुरू होऊन कॅम्प ४, चोपडा कोर्ट, टॉवर चौक, शांतीनगर आणि वसंत व्हॅलीमार्गे अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पूर्व प्रवेशद्वारापर्यंत धावणार आहे. ही बस सेवा उल्हासनगर व अंबरनाथ या दोन शहरी विभागांमध्ये दळणवळणाचा विश्वासार्ह पर्याय ठरली आहे.


दरम्यान, बस क्रमांक ए-२०१ ही एक संयुक्त सेवा असून, उल्हासनगर ते वाशी दरम्यान चालणारी ही बस कल्याण, डोंबिवली, दिवा, म्हापे व तुर्भे या महत्त्वाच्या औद्योगिक आणि वाणिज्यिक ठिकाणांवरून मार्गक्रमण करते. ही सेवा उल्हासनगर महानगरपालिका व नवी मुंबई महानगर परिवहन (NMMT) यांच्या संयुक्त सहकार्याने चालवण्यात येत आहे. विशेषतः नवी मुंबईत नोकरी करणाऱ्या नागरिकांसाठी ही सेवा फारच उपयुक्त ठरली आहे.


उपरोक्त बससेवांमुळे उल्हासनगर शहर व परिसरातील प्रवाशांना महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्था, औद्योगिक क्षेत्रे, व्यापारी बाजारपेठा तसेच रेल्वे स्थानकांशी थेट संपर्क साधता येतो. नागरिकांनी या मार्गांचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.


नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येक बस मार्गावरील थांब्यांची स्पष्ट माहिती आता बस डेपो, थांबे आणि अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रवाशांनी अधिकृत वेळापत्रक व मार्गांचा आढावा घेत बससेवा वापर करण्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post