पु. ल. देशपांडे संघ उपविजेता ; क्रिकेट महोत्सव उत्साहात संपन्न
डोंबिवली : आमदार रवींद चव्हाण, (प्रदेशाध्यक्ष, भाजप महाराष्ट्र प्रदेश) यांच्या डोंबिवलीकर - एक सांस्कृतिक परिवाराच्या संकल्पनेतून आयोजित व ‘मराठी सेलिब्रेटी क्रिकेट लीग (MCCL)’ अंतर्गत पार पडलेला ‘डोंबिवलीकर चषक’ हा भव्य क्रिकेट महोत्सव जल्लोषात संपन्न झाला. या स्पर्धेत कॅप्टन हार्दिक जोशी यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भालजी पेंढारकर संघाने विजेतेपद पटकावले, तर कॅप्टन प्रवीण तरडे यांच्या नेतृत्वाखालील पु. ल. देशपांडे संघ उपविजेता ठरला. या महोत्सवामुळे डोंबिवलीच्या ‘कलानगरी’ व ‘क्रीडानगरी’ या नावलौकिकाला मोलाची भर मिळाली.
कल्याण-डोंबिवली शहरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या अनोख्या क्रिकेट महोत्सवामुळे संपूर्ण शहराला वेगळाच ग्लॅमर प्राप्त झाला होता. या भव्य उपक्रमात तब्बल ८० सुप्रसिद्ध मराठी सिनेकलाकार, सिनेदिग्दर्शक व सिनेनिर्माते मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.
स्पर्धेतील संघांना दादासाहेब फाळके, व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर, पु. ल. देशपांडे, दादा कोंडके, निळू फुले, रंजना आणि भक्ती इनामदार अशा मराठी मनोरंजनसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्त्वांची नावे देण्यात आली होती. मराठी मनोरंजनविश्वाला दिलेल्या बहुमूल्य योगदानासाठी या मातब्बर कलाकारांना या निमित्ताने आगळीवेगळी मानवंदना देण्यात आली.
वर्षानुवर्षे टीव्ही, चित्रपट व नाट्यभूमीवर प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे कलाकार यावेळी बॅट-बॉल हातात घेऊन क्रिकेट मैदानात उतरल्याचे दृश्य नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरले. त्यांच्या बहारदार खेळीमुळे ही स्पर्धा डोंबिवली परिसरातील नागरिकांसाठी अविस्मरणीय ठरली. विजेत्या संघातील सर्व खेळाडूंचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हार्दिक अभिनंदन करत महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक कौतुक व आभार व्यक्त केले.
#DombivlikarChashak #MCCL #DombivlikarEkSanskrutikParivar


