उरण नगरपरिषद निवडणूक ; राष्ट्रवादी शरद पवार गट सतर्क
उरण : उरण नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर निकाल जाहीर होण्यास विलंब होत असल्याने मतदान पेट्या आणि ईव्हीएम मशीनच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षातील भावना घाणेकर यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी थेट मैदानात उतरून ईव्हीएम मशीनची स्वतःहून सुरक्षा करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.
कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये, निकाल प्रक्रियेची निष्पक्षता कायम राहावी, यासाठी या महिला कार्यकर्त्या उरण नगरपरिषदेच्या इमारतीसमोरच ठाण मांडून आहेत. रस्त्यावरच जेवण, तिथेच झोप आणि अहोरात्र पहारा असा त्यांचा दिनक्रम सुरू आहे. डासांपासून बचावासाठी मच्छरदाणी, पाणी, चादरी-गाद्या यांची व्यवस्था करत या महिलांनी प्रतिकूल परिस्थितीतही सतर्कता कायम ठेवली आहे.
“आमचा लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे; मात्र निकाल जाहीर होईपर्यंत मतदान पेट्यांच्या बाबतीत काहीही गैर होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनासोबत आम्ही स्वतः दक्षता घेत आहोत,” अशी भूमिका यावेळी महिला कार्यकर्त्यांनी स्पष्ट केली. ‘रात्र वैर्याची’ असा नारा देत त्यांनी लोकशाहीच्या संरक्षणासाठी जागता पहारा सुरू ठेवला आहे.
या संपूर्ण घटनेत महिला नेतृत्व आणि सहभाग ठळकपणे समोर येत असून, निष्पक्ष निवडणुकीसाठी महिलांनी घेतलेला पुढाकार उरण शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. निकाल जाहीर होईपर्यंत हा कडक पहारा सुरूच राहणार असल्याचा निर्धारही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास, पारदर्शकता आणि निवडणूक व्यवस्थेची शुचिता जपण्यासाठी उरणमधील या महिलांनी दिलेला लढा सध्या संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेत आहे.


