दिवा / आरती परब : कोकण प्रतिष्ठान (दिवा) या सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन काल रविवारी विठ्ठल-रुक्मिणी हॉल, दिवा (पूर्व) येथे उत्साहात पार पडले. यामध्ये १०वी, १२वी आणि पदवीधर परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष संतोष पडयार होते. या प्रसंगी सचिव प्रीतम शिंदे, खजिनदार रमेश शिंदे, उपाध्यक्षा संगीता उतेकर, उपसचिव मंगेश भितळे, कार्याध्यक्ष चंद्रकांत राणे, सल्लागार निलेश पाटणे आदी पदाधिकारी उपस्थित होते आणि कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले. या सोहळ्यात विद्यार्थ्यांसोबत पालकांची देखील उल्लेखनीय उपस्थिती होती. कार्यक्रमास माजी नगरसेविका दर्शना म्हात्रे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन याचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमास डोंबिवली शाखाप्रमुख उमेश सुर्वे, माजी अध्यक्ष देवदत्त घाडी, खेड तालुका अध्यक्ष सतीश निकम, समाजसेवक दिनेश भोईर, शाखाध्यक्ष कुशल पाटील, तसेच संघटनेचे आजी- माजी कार्यकारी समिती सदस्य यांनी हजेरी लावून उपस्थित विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. कार्यक्रमाची विशेष आकर्षण ठरली कुमारी मंदिरा जाधव हिचे शिवकालीन शस्त्रप्रदर्शन. तिने लाठी- काठी चालवून छत्रपतींच्या पराक्रमाची झलक उपस्थितांसमोर सादर केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये उद्योजक रुपेश सावंत आणि अरविंद चंदूरकर यांचे आर्थिक व सहकार्यात्मक योगदान मोलाचे ठरले. संघटनेचे प्रवक्ते प्रवीण उतेकर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक व करिअर मार्गदर्शन करताना "गुणवत्तेच्या जोडीला मूल्यांची जोड आवश्यक" असल्याचे स्पष्ट केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सल्लागार निलेश पाटणे यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी अध्यक्ष संतोष पडयार यांनी सांगितले की, "कोकणी माणसाने कोकणी माणसासाठी एकत्र यावं," हा आमचा मुख्य उद्देश आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य व क्रीडा क्षेत्रात कोकण प्रतिष्ठान (दिवा) ही संघटना भविष्यातही सक्रीय राहणार आहे, आणि अशा कार्यक्रमांची मालिका आगामी काळातही सुरूच राहील.