डोंबिवली \ शंकर जाधव : कल्याण - डोंबिवली महानगर पालिका अंतर्गत असलेल्या आणि कावळ्याचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या उंबार्ली गावात भव्य वारकरी भवन आमदार राजेश मोरे यांच्या आमदार निधीतून उभारण्यात येणार आहे. या वारकरी भवनाचा भूमिपूजन सोहळा सोमवारी एकादशीचे औचित्य साधून करण्यात आला. आमदार राजेश मोरे आणि ठाणे रायगड वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह.भ.प.चेतन महाराज यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात रामकृष्ण हरी असा जयघोष करण्यात आला. यावेळी उंबार्ली तसेच पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ तसेच वारकरी मंडळातील सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी छोटेखानी झालेल्या समारंभाच्या व्यासपीठावर कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, ठाणे रायगड वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह.भ.प. चेतन महाराज, ह.भ.प अनंता महाराज, ह.भ.प हनुमान महाराज, बंडू पाटील, भरत भोईर, किसन जाधव, सुभाष पाटील, अमोल भोजने, केशव पाटील, मुकेश पाटील, प्रमिला पाटील, शैलजा भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
उंबार्ली गावात वारकरी भवन व्हावे यासाठी लालचंद पाटील, कैलास पाटील, वारकरी संप्रदाय उंबार्ली, गजानन भोईर, रतन काळू भोईर तसेच समस्त उंबार्ली ग्रामस्थांकडून भव्य बहुउद्देशीय सभागृहाची संकल्पना व पाठपुरावा करण्यात आला. या भव्य बहुउद्देशीय सभागृहासाठी 50 लाख रुपये आमदार दिनी खर्ची होणार असल्याची माहिती लालचंद पाटील यांनी दिली. या सभागृहाच्या निर्मितीनंतर धार्मिक, शैक्षणिक तसेच सामाजिक कार्यक्रमसाठी सुसज्ज जागा होईल. परिणामी वारकरी परंपरा जपण्यासाठी मदत होईल असे आमदार राजेश मोरे यांनी यावेळी सांगितले. वारकरी संप्रदाय वाढीसाठी अशा वास्तू खूप महत्वाच्या आहेत असे अध्यक्ष ह.भ.प. चेतन महाराज यांनी सांगितले.


