जळगाव-भुसावळ प्रवाशांना दिलासा
जळगाव : जळगाव-भुसावळ मार्गावरील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ (सुरत–नागपूर) वरील नशिराबाद टोल नाक्याजवळ बांधण्यात येत असलेला रेल्वे उड्डाणपूल आता पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने आज या पुलावर ३६ मीटर लांबीचे आणि ३३ टन वजनाचे दोन गर्डर यशस्वीरित्या बसविण्यात आले.
सदर उड्डाणपुलासाठी एकूण पाच गर्डर बसविण्याचे नियोजन असून, उर्वरित गर्डर बसविण्याचे काम सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत हे काम पूर्ण होऊन पूल प्रवाशांच्या सेवेसाठी खुला होणार आहे.
सध्या जळगाव–भुसावळ मार्गिकेवरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू आहे. या नव्या गर्डर बसविण्याच्या कामामुळे भुसावळ–जळगाव मार्गिकेवरील पुल देखील लवकरच सुरू होईल. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक अधिक सुरक्षित, सुरळीत आणि वेगवान होणार असून, प्रवाशांना दररोज भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडी व वेळेच्या अडचणींना पूर्णविराम मिळेल.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, काम सुरू असताना संयम राखावा, दिलेल्या मार्गदर्शन व वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, जेणेकरून अपघात टाळता येतील व काम वेगाने पूर्ण होईल.
या प्रकल्पामुळे केवळ जळगाव-भुसावळ प्रवासीच नव्हे तर दूरगामी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. नागपूर, भुसावळ, धुळे तसेच गुजरातकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील प्रवास आता अधिक वेगवान आणि अखंडित होईल, असा विश्वास संबंधित विभागाने व्यक्त केला आहे.