रस्ता दुरुस्तीबद्दल रमाकांत मढवी यांचा सत्कार


दिवा \ आरती परब  : दिव्यातील एसएमजी शाळेजवळील श्री साई गणेश मित्र मंडळ येथे दरवर्षी दिव्याचा लंबोदर बाप्पा प्रतिष्ठापित होतो. याच परिसरातील सात ते आठ इमारतींच्या अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली होती. लाद्या उखडल्याने नागरिकांना चालणे कठीण झाले होते. ही समस्या स्थानिक रहिवासी श्रीगणेश पाटील आणि युवराज यादव यांनी दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी यांच्यापर्यंत पोहोचवली.


रमाकांत मढवी यांनी तत्काळ पुढाकार घेत रस्त्याचे काँक्रीटीकरण करून दिले. या कामाबद्दल श्री साई गणेश मित्र मंडळ आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने माजी उपमहापौर व शिवसेना दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी यांचा सत्कार करण्यात आला. रहिवाशांच्या हस्ते पार पडलेल्या या सोहळ्यात नागरिकांनी त्यांच्या विकास कामांचे कौतुक केले.


कार्यक्रमात ॲड. आदेश भगत यांनी मढवी यांच्या माध्यमातून दिवा शहरात झालेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील अनधिकृत बांधकामावरील दंड रद्द केल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.


या प्रसंगी शिवसेना उपशहर प्रमुख आदेश भगत, विभाग प्रमुख निलेश पाटील, युवराज यादव यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते. नागरिकांच्या एकत्रित सहभागामुळे सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.




Post a Comment

Previous Post Next Post