ठाणे : राज्यातील जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी आज ठाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापाशी राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले. पक्षप्रमुखम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती, ठाणे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हा शाखा तसेच महाविकास आघाडीतील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक व पुरोगामी संघटनांच्या वतीने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.
या आंदोलनात “जनसुरक्षा कायदा रद्द करा” अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनाला माजी खासदार राजन चव्हाण, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ठाणे शहर प्रमुख सुहास देसाई, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ओवळा-माजिवडा विधानसभेचे संपर्क प्रमुख नरेश मणेरा, शहरप्रमुख व पक्ष प्रवक्ते अनिष गाढवे आदींसह विविध आघाडीतील नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच कोपरी-पाचपाखाडी, ठाणे शहर, कळवा-मुंब्रा-दिवा विधानसभा क्षेत्रातील उपजिल्हाप्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख, महिला जिल्हा संघटक, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, समन्वयक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, युवासेना व युवतीसेना कार्यकर्त्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
नेत्यांनी आपल्या भाषणातून जनसुरक्षा कायदा हा नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा असून तो तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. अन्यथा पुढील काळात संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.


