शाहूपुरी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
कोल्हापूर/ शेखर धोंगडे : शाहूपुरी पोलिसांनी घरफोडी व जाळपोळ प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे ८ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काटेमळा परिसरातील मुक्त सैनिक वसाहत येथील ईरा गार्डन अपार्टमेंटमध्ये राहणारे शिवाजी आकाराम पाटील (वय ६५) यांच्या घरात ५ जून रोजी सायंकाळी ६ ते ६ जून रोजी पहाटे ५ या कालावधीत अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. घरातील देव्हाऱ्याच्या ड्रॉवरमधील सोन्याचे दागिने तसेच कपाटातील २ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने घराला आग लावल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत आशिष जयकुमार पाटील (वय २४, रा. मुक्त सैनिक वसाहत, ईरा गार्डन अपार्टमेंट, कोल्हापूर) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
आरोपीकडून ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १५ ग्रॅम वजनाचा कोल्हापुरी साज, ११ सोन्याच्या अंगठ्या तसेच २ लाख रुपयांची रोकड असा एकूण ८ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार, आकाश जाधव तसेच गुन्हे शोध पथकातील मिलिंद बांगर, बाबासाहेब ढाकणे, अमोल पाटील, कृष्णात पाटील, रविकुमार आंबेकर, महेश पाटील, गौरव शिंदे, राहुल पाटील, सुशीलकुमार गायकवाड, सनिराज पाटील, सचिन पांगे आणि उत्तम पाटील यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार करीत आहेत.
