दिवा शहरात 'पाणीटंचाईच्या स्मारकांचे' श्राद्ध!

 


महिला आघाडीचे अनोखे आंदोलन

निष्क्रिय प्रशासनावर तिखट प्रहार


दिवा \ आरती परब : तब्बल १३ वर्षांपासून धूळ खात पडून असलेल्या आणि अद्याप कार्यान्वित न झालेल्या बेतवडे येथील दोन जलकुंभांचे. रविवारी श्राद्ध घालून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीने प्रशासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.


दिवा शहरातील तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या नागरिकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने श्राद्धविधी करून या जलकुंभांचे श्राद्ध घालण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी जलकुंभांचे फोटो व श्राद्धपिंड हातात घेऊन घोषणाबाजी केली. “पाण्याअभावी जनता त्रस्त, प्रशासन मात्र मस्त!” आणि “१३ वर्षांचे मौन, आता जनतेचा शाप!” अशा घोषणा परिसरात घुमल्या.


या आंदोलनाचे नेतृत्व दिवा शहर महिला संघटक ज्योती राजकांत पाटील यांनी केले. त्या म्हणाल्या, “१३ वर्षांपासून बंद असलेले जलकुंभ म्हणजे प्रशासनाच्या अपयशाचे प्रतीक आहे. इतक्या वर्षांत हे कार्यान्वित न होणे म्हणजे जनतेच्या पाण्याच्या हक्काकडे शासन गांभीर्याने पाहत नाही. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांमध्ये दिवा शहराचा पाणीपुरवठा प्रशासन अपयशी ठरत आहे.” त्यांनी ठाणे महापालिका आयुक्तांना आंदोलनाबाबत पूर्वसूचना देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याचेही नमूद केले.


आंदोलनाच्या मुख्य मागण्या

  • बेतवडे येथील दोन्ही जलकुंभांची दुरुस्ती करून तात्काळ कार्यान्वित करावेत.
  • दिवा शहरातील सर्व वस्त्यांना समान दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा करावा.
  • कोट्यवधी रुपये खर्चूनही जलकुंभ निष्क्रिय राहिल्याप्रकरणी चौकशी करावी.


या आंदोलनाला दिवा शहरातील महिलांसह अनेक नागरिकांनी मोठा पाठिंबा दिला. नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल संताप व्यक्त करत पाणीटंचाईच्या समस्येवर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली.



अनेक आंदोलने, निवेदने आणि पत्रव्यवहार होऊनही ठाणे महापालिकेने अद्याप ठोस भूमिका घेतलेली नाही. या पार्श्वभूमीवर हे आंदोलन केवळ सांकेतिक न राहता प्रशासनाविरोधातील जनआक्रोश ठरत आहे. “प्रशासन आता तरी जागे होईल का?” असा सवाल दिवावासीयांकडून उपस्थित केला जात आहे.


या आंदोलनास माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, माजी आमदार सुभाष भोईर व जिल्हा संघटक तात्या माने यांचे मार्गदर्शन लाभले. महिला जिल्हा संपर्कप्रमुख मृणाल यज्ञेश्वरी व महिला जिल्हा संघटिका वैशाली दरेकर-राणे यांच्या सूचनेनुसार आंदोलनाचे आयोजन झाले. युवासेना पदाधिकारी अभिषेक ठाकूर, उपशहर प्रमुख तेजस पोरजी, मारुती पडळकर, समन्वयक प्रियंका सावंत, स्मिता जाधव, उज्वला पाटील, शहर संघटक शनिदास पाटील आदींसह महिला व शाखाप्रमुखांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. दिवा शहरातील पाणीटंचाईसंदर्भात प्रशासन आता तरी जागे होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




Post a Comment

Previous Post Next Post