नवी मुंबई महापालिका निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी १ जानेवारीपासून प्रशिक्षण कार्यक्रम

 


६ हजारहून अधिक अधिकारी–कर्मचाऱ्यांचे विभागनिहाय प्रशिक्षण

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ ही पारदर्शक, सुरळीत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावी, यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुसूत्र प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ६ हजारहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विभागनिहाय प्रशिक्षणाचे सविस्तर वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण २८ प्रभागांतील १११ जागांसाठी दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. यासाठी शहरात १,१४८ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक नियोजन करण्यात आले आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने ८ विभागांसाठी ८ निवडणूक निर्णय अधिकारी, प्रत्येक विभागासाठी ३ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच १८० क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

मतदान केंद्रांवर स्वतंत्र पथके

निवडणूक प्रक्रिया अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, तीन सहाय्यक मतदान अधिकारी व शिपाई यांचा समावेश असलेली स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत. त्याचबरोबर कोणत्याही आकस्मिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी राखीव पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.

पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण

नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण
दि. १ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत
विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी तसेच
सरस्वती विद्यालय, ऐरोली येथे विभागनिहाय सत्रांमध्ये आयोजित करण्यात आले आहे. 

दि. १ जानेवारी : नेरुळ विभाग

दि. २ जानेवारी : बेलापूर विभाग

दि. ४ जानेवारी : दिघा विभाग

दि. ५ जानेवारी : घणसोली विभाग

दि. ६ जानेवारी : कोपरखैरणे व तुर्भे विभाग (दोन सत्रे)

दि. ७ जानेवारी : वाशी विभाग

तसेच दि. ६ जानेवारी २०२६ रोजी ऐरोली विभागातील मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सरस्वती विद्यालय, सेक्टर–५, ऐरोली येथे होणार आहे. याच धर्तीवर दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण वर्ग दि. ८ ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार असून, त्यासाठीचे स्वतंत्र वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post