भाजपच्या पाठपुराव्याला यश
दिवा \ आरती परब : दिवा शहरातील स्टेशन परिसरात असलेल्या तलावाची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. तलावात मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक व सांडपाणी साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. यामुळे डासांची उत्पत्ती वाढून मलेरिया, डेंग्यू व चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला होता.
या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत भारतीय जनता पार्टी, दिवा- शीळ मंडळाचे अध्यक्ष सचिन रमेश भोईर यांनी दिवा प्रभाग समिती व पालिका प्रशासनाकडे निवेदन सादर केले होते. निवेदनात तलावाच्या अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे नमूद करत तातडीने स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली होती.
भाजप दिवा मंडळाच्या ठाम पाठपुराव्याला अखेर यश आले असून, महापालिका प्रशासनाने या निवेदनाची दखल घेत तलाव स्वच्छता मोहीम तात्काळ हाती घेतली आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून तलावातील कचरा काढण्यात येत असून परिसर स्वच्छ करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
यावेळी सचिन भोईर यांनी प्रशासनाच्या या कारवाईचे स्वागत करत, भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी तलावाची नियमित देखभाल व स्वच्छतेची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची गरज असल्याचे सांगितले. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित विषयांवर भाजप दिवा मंडळ सातत्याने पाठपुरावा करीत राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


