लाखो लिटर पाणी वाया; पाणीपुरवठा ठप्प
डोंबिवली / शंकर जाधव : कल्याण-शिळ रोडवरील काटई नाक्याजवळ एमआयडीसीची पाण्याची मोठी पाईपलाईन सोमवारी (२२ डिसेंबर) दुपारी अचानक फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. या घटनेमुळे डोंबिवली एमआयडीसी परिसरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील पाणीपुरवठा काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाला होता.
सध्या सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान ही पाईपलाईन फुटल्याची प्राथमिक माहिती असून, मागील दोन महिन्यांतील ही तिसरी घटना आहे. वारंवार पाईपलाईन फुटण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पाईपलाईन फुटताच परिसरात पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू झाला होता. संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाणीपुरवठा बंद केला. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असले तरी, या प्रकारामुळे एमआयडीसीतील उद्योगधंदे तसेच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
मेट्रो कामादरम्यान आवश्यक खबरदारी न घेतल्यामुळेच अशा घटना घडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात असून, संबंधित ठेकेदार व प्रशासनाने अधिक दक्षता घ्यावी, अशी मागणी होत आहे.