छत्रपती ताराराणींच्या प्रेरणेने ‘रणरागिणीं’ बनविण्याचा निर्धार


 कोल्हापुरात ७ डिसेंबरला शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर

१ हजारपेक्षा अधिक युवतींसाठी विनामूल्य आत्मरक्षण प्रशिक्षण

कोल्हापूर \ शेखर धोंगडे : आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनत असताना कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर आत्मरक्षण आणि शौर्य प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु जनजागृती समिती, सव्यसाची गुरुकुलम् आणि भागिरथी महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ७ डिसेंबर रोजी ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर’ पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, खरी कॉर्नर येथे होणार आहे.


या शिबिरासाठी आधीच १ हजारहून अधिक युवतींची नोंदणी झाली असून १०० पेक्षा अधिक प्रशिक्षक प्रशिक्षण देणार आहेत. महिलांना सुरक्षित, स्वावलंबी आणि आत्मप्रतिरक्षणक्षम बनवण्याचा उद्देश समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.


घनवट म्हणाले की, एनसीआरबीच्या अहवालानुसार गेल्या तीन वर्षांत देशभरातील १० लाख मुली बेपत्ता झाल्या असून, त्यापैकी सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातील आहे. त्यामुळे समाजाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शिबिरात वास्तविक संकटसमयी महिलांनी स्वतःचा बचाव कसा करावा याची प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहेत.


ऐतिहासिक शस्त्रांचे आकर्षक प्रदर्शन


‘सव्यसाची गुरुकुलम्’चे प्रधान आचार्य लखन जाधव यांनी सांगितले की, शिवकालीन तलवार, ढाल, भाला, कट्यार, जांभिया आदी दुर्मिळ शस्त्रांचे विशेष प्रदर्शन शिबिरस्थळी मांडण्यात येणार आहे. ७ डिसेंबरला सकाळी ८ ते रात्री ८ आणि ८ डिसेंबरला फक्त विद्यार्थ्यांसाठी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत प्रदर्शन खुले राहील.


सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी सांगितले की, कराटे, लाठी-काठी, तसेच आत्मबल वृद्धिंगत करणाऱ्या तंत्रांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सहभागी प्रत्येक युवतीला प्रमाणपत्र दिले जाईल.


 विशेष उपस्थिती

ऑलिम्पिक नेमबाज तेजस्विनी सावंत,

आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर स्नेहांकीता वरुटे,

‘आंतरराष्ट्रीय आर्यनमॅन’ माहेश्‍वरी सरनोबत,

पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील,

सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये,

ABP माझाची कार्यकारी संपादिका सरिता कौशिक


या मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे  शिवानंद स्वामी यांनी दिली.अधिक माहितीसाठी संपर्क : 70207 10460


शिबिराची वैशिष्ट्ये

कराटे, लाठी-काठी व स्वसंरक्षण प्रशिक्षण

शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके

आपत्कालीन प्रसंगी उपयोगी प्रथमोपचार

शिवकालीन शस्त्रांचे अनोखे प्रदर्शन

संकटसमयी जलद बचावाच्या सोप्या पद्धती

तज्ज्ञ महिला मार्गदर्शकांचे सत्र व प्रमाणपत्र


Post a Comment

Previous Post Next Post