दिवे-केवणी खाडीत अवैध वाळू उपशावर धडक कारवाई



१० बार्ज आणि १६ सक्शन पंप जप्त; ३.६० कोटींचा मुद्देमाल नष्ट करण्याची प्रक्रिया

भिवंडी| प्रतिनिधी
MAHARASHTRA WEBNEWS

भिवंडी तालुक्यातील दिवे-केवणी (दिवे बंदर) खाडीपात्रात अवैध वाळू उत्खननाविरोधात ठाणे जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. महसूल विभाग, जिल्हा खनिकर्म विभाग, दक्षता पथक, पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र सागरी मंडळाच्या संयुक्त पथकाने मध्यरात्री धाड टाकून १० अनधिकृत बार्ज आणि १६ सक्शन पंप जप्त केले. या साहित्याची किंमत सुमारे ३.५० ते ३.६० कोटी रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. सोमवार, २८ सप्टेंबरच्या रात्री सुरू झालेली कारवाई मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी पहाटे निर्णायक टप्प्यावर पोहोचली.

कारवाईची चाहूल लागताच बार्ज पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न

जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले यांच्या नेतृत्वाखाली दक्षता पथक क्रमांक १ आणि २, ठाणे तहसीलदार उमेश पाटील, भिवंडी तहसीलदार अभिजीत खोले आणि अन्य अधिकारी दिवे-केवणी स्मशानभूमीजवळील खाडीपात्रात गस्त घालत होते. यावेळी खाडीमध्ये सुरू असलेला अवैध वाळू उपसा निदर्शनास आला.

संयुक्त पथकाची चाहूल लागताच काही कामगारांनी बार्ज आणि सक्शन पंपांचे व्हॉल्व्ह उघडून ते पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न केल्याचे प्रशासनाने सांगितले. पळून जाण्याच्या प्रयत्नात बार्ज कांदळवनाला धडकल्याने पर्यावरणाचे नुकसान झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.



एका कामगाराला पकडले

कारवाईदरम्यान बहुतांश कामगारांनी खाडीच्या पाण्यात उड्या मारून पळ काढला. मात्र, तोहीब रमझान शेख (वय १९, मूळ रा. साहिबगंज, झारखंड) याला पकडण्यात आले. त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जप्त करण्यात आलेले सर्व १० बार्ज महाराष्ट्र सागरी मंडळाकडे नोंदणीकृत नसल्याचे तपासणीत आढळल्याची माहिती प्रशासनाने दिली.

बार्ज आणि पंप नष्ट करण्याची प्रक्रिया

पाण्यात बुडवलेले बार्ज बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने ओहोटीची प्रतीक्षा केली. त्यानंतर अधिकारी खाडीपात्रात उतरले आणि बार्जचे व्हॉल्व्ह बंद करून ते पुन्हा तरंगत्या स्थितीत आणले. भरतीच्या वेळी बोटींच्या मदतीने हे बार्ज आणि सक्शन पंप कळव्यातील गणेश घाट तसेच मुंब्रा येथे हलविण्यात आले. ते स्क्रॅप करून नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.

जप्त केलेल्या साहित्याचा ताबा खारबावचे मंडळ अधिकारी सुधाकर कामडी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

विविध कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया

अवैध वाळू उत्खनन आणि पर्यावरणाच्या नुकसानीप्रकरणी भारतीय न्याय संहिता, पर्यावरण संरक्षण कायदा आणि महसूल अधिनियमातील तरतुदींनुसार भिवंडी व मुंब्रा पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

या मोहिमेत उपविभागीय अधिकारी अमित सानप, उर्मिला पाटील, तहसीलदार अभिजीत खोले, उमेश पाटील, जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले, मंडळ अधिकारी सुधाकर कामडी, वंजारी, गणेश विशे आणि तलाठी सूर्यकांत पाटील यांनी सहभाग घेतला.

तसेच दक्षता पथकातील सहाय्यक महसूल अधिकारी संजय बाळाराम जाधव, महसूल सहाय्यक दिनेश बोऱ्हाडे, दर्शन नटे, अनिल राजपूरे, पोलीस शिपाई संदीप शिसोदे आणि मारुती यमगार यांनी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

अवैध वाळू उत्खननाविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू ठेवण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post