आठ दिवसांत युद्धपातळीवर पुलाची दुरुस्ती पूर्ण
कल्याण : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या धामधुमीच्या काळात वाहतूककोंडीचा त्रास कमी व्हावा, नागरिकांना प्रवास करणे सुलभ व्हावे, यासाठी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचे निर्देशानुसार महानगरपालिकेने युद्धपातळीवर काम करीत केवळ आठ दिवसात वालधुनी पुलाची दुरुस्ती करून हा उड्डाणपूल सोमवारपासून नागरिकांच्या सोयीसाठी वाहतुकीस खुला करण्यात आला, यामुळे कल्याण, डोंबिवली तसेच उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शेजारील शहरांतील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वालधुनी पुलावर व्यापक दुरुस्ती कामासाठी महानगरपालिकेने २० डिसेंबर ते १० जानेवारी या कालावधीत २० दिवस पुल बंद ठेवण्याची परवानगी वाहतूक पोलिसांकडे मागितली होती. मात्र, चोवीस तास सुरू असलेल्या कामकाजामुळे तसेच अतिरिक्त यंत्रसामग्री तैनात केल्यामुळे हे काम अवघ्या आठ दिवसांत पूर्ण करण्यात आले असून पुलावरील पदपथदुरूस्ती , रंगरंगोटी, तसेच इतर किरकोळ दुरुस्तीची कामे पुलावरील वाहतूक सुरू ठेवून पुढील दोन आठवड्यात पूर्ण करण्यात येतील अशी माहिती विशेष प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी दिली.
या दुरुस्ती कामाचे कंत्राट शाह इंजिनिअर्स यांना देण्यात आले होते , तर जय भारत कन्स्ट्रक्शन उपकंत्राटदार म्हणून कार्यरत होते. ठरवून दिलेल्या दर्जा निकषांनुसार डांबरीकरणाचे काम करण्यात आले असून कराराच्या अटींनुसार पुढील पाच वर्षे रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावरच राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी दिली आहे .
