१५० दिवसांच्या राज्यस्तरीय मूल्यमापनात उल्लेखनीय कामगिरी
ठाणे : राज्यातील शासकीय कार्यालयांच्या कामकाजाचे १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या मूल्यमापनात जिल्हा परिषद ठाणे यांनी राज्यात तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या मूल्यमापनात डिजिटल प्रशासनाशी संबंधित सात महत्त्वाच्या निकषांवर कामगिरी तपासण्यात आली. त्यामध्ये संकेतस्थळ व्यवस्थापन, ‘आपले सरकार’ प्रणाली, ई-ऑफिसचा वापर, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर, जीआयएस (GIS) प्रणालीचा प्रभावी उपयोग या सर्व बाबींमध्ये जिल्हा परिषद ठाणे यांनी उत्कृष्ट कार्यक्षमता दाखवत राज्यात अव्वल स्थानांमध्ये मजल मारली.
या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले आहे.
डिजिटल प्रशासनाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल जिल्हा परिषद ठाणेच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाचे आणि प्रभावी कामकाजाचे द्योतक मानले जात आहे. राज्य शासनातर्फे लवकरच सर्व विजेत्यांचा अधिकृत गौरव सोहळा आयोजित केला जाणार आहे.
