डॉन ३ या बहुचर्चित चित्रपटातून रणवीर सिंग बाहेर पडल्यानंतर अभिनेता आणि एक्सेल एंटरटेन्मेंट यांच्यात मतभेद उफाळून आले आहेत. रणवीरच्या एक्झिटमुळे प्री-प्रॉडक्शनमध्ये मोठे नुकसान झाल्याचा दावा निर्मात्यांनी केला असून, त्या नुकसानीची भरपाई रणवीरने करावी अशी भूमिका कंपनीने घेतल्याचे समोर येत आहे. मात्र रणवीरने पटकथा समाधानकारक नसल्यामुळेच प्रकल्पातून माघार घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
व्हरायटी इंडियाच्या माहितीनुसार, “रणवीरला अंतिम पटकथा आवडली नव्हती. त्याने अनेक बदल सुचवले होते, मात्र अंतिम मसुद्यावर तो समाधानी नव्हता. दुसरीकडे, एक्सेल एंटरटेन्मेंटचा दावा आहे की रणवीरच्या संमतीनंतरच त्यांनी प्री-प्रॉडक्शन सुरू केले होते.” या वादावर तोडगा काढण्यासाठी रणवीर आणि एक्सेल यांच्यात जवळपास दोन तासांची बैठक झाली, मात्र त्यातून कोणताही निष्कर्ष निघू शकला नाही. प्रकरण वाढत असल्याने आता प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडिया (PGI) मध्यस्थी करत असल्याची माहिती आहे.
दरम्यान, रणवीर सिंगच्या एक्झिटनंतर काही आठवड्यांतच फरहान अख्तरने डॉन ३ सध्या होल्डवर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. पिंकविलाच्या अहवालानुसार, कास्टिंगबाबत घाई न करता योग्य कलाकार निवडण्यासाठी वेळ घेण्याचा फरहानचा विचार असून, तोपर्यंत तो जी ले झरा या प्रकल्पावर लक्ष केंद्रित करणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट आणि कॅटरीना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
