काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारवर टीका
मुंबई : वडाळा-कासारवडवली ग्रीन लाइन, मेट्रो ४ च्या बांधकामादरम्यान मुलुंडमधील एलबीएस रोडवर मेट्रो स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेवर टीका करत म्हटले की, तथाकथीत विकास पुरुष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची जबाबदारी घ्यावी. त्यांनी म्हटले की, महायुती सरकारमध्ये सुरु असलेला भ्रष्टाचार आता लोकांच्या जीवावर उठला असून, मेट्रोसारख्या सार्वजनिक प्रकल्पांमध्ये सुरक्षेची योग्य काळजी घेतली जात नाही.
सपकाळ म्हणाले, “केवळ कंत्राटदारावर कारवाई करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. जसे श्रेय सरकार घेत असते, तशी जबाबदारी देखील घेतली पाहिजे.” त्यांनी कोस्टल रोड, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड, समृद्धी महामार्ग यांसारख्या प्रकल्पांचे उदाहरण देत म्हटले की, मोठ्या खर्चाचे प्रकल्प जनतेसाठी जीवघेणे ठरत असतील, तर असा विकास कामाचा नाही.
त्यांनी सरकारकडे मागणी केली की, मुलुंडमधील मेट्रो स्लॅब कोसळण्याची घटना गांभिर्याने तपासून ठोस कारवाई करावी आणि भविष्यात अशी दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
