पालघर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (आयटीडीपी) जव्हारच्या प्रकल्प अधिकारी अपूर्वा बसूर यांना राष्ट्रीय स्तरावरील ‘सर्वोत्कृष्ट कामगिरी प्रकल्प अधिकारी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ही माहिती जिल्हा प्रशासनाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनाद्वारे दिली.
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प/संस्था बळकटीकरण राष्ट्रीय परिषदेत अपूर्वा बसूर यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामध्ये पाच लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले असून, आदिवासी विकास क्षेत्रातील उल्लेखनीय नेतृत्व, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रत्यक्ष परिणामकारक कामगिरीची दखल म्हणून हा सन्मान देण्यात आला आहे.
देशभरातील प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कठोर राष्ट्रीय मूल्यांकन प्रक्रियेनंतर २०२२ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी अपूर्वा बसूर यांची निवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली आयटीडीपी जव्हारने विविध पथदर्शी उपक्रम राबवले असून, त्यांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. या यशामुळे पालघर जिल्ह्यासह राज्याच्या आदिवासी विकास कार्याला राष्ट्रीय स्तरावर विशेष गौरव प्राप्त झाला आहे.
