अंतर योग फाउंडेशनच्या विशेष साधनेला ठाण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
नवी मुंबई / ठाणे : अंतर योग फाउंडेशन तर्फे महाशिवरात्री च्या पावन पर्वानिमित्त ठाण्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेली सर्वांसाठी खुली व मोफत जीवन-परिवर्तनकारी विशेष साधना मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाली. या भव्य आध्यात्मिक सोहळ्यास ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई परिसरातील १००० हून अधिक भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.
फाउंडेशनचे संस्थापक ब्रह्मर्षी आचार्य उपेंद्र जी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या साधना शिबिराने आध्यात्मिकतेसोबतच आरोग्य आणि मानसिक स्थैर्याचा संदेश दिला.
सकाळी ७ वाजता प्रारंभ झालेल्या या साधना शिबिरात आरोग्य, समृद्धी, सुदृढ नातेसंबंध, शैक्षणिक प्रगती आणि आध्यात्मिक उन्नती यांसाठी विविध प्रभावी सत्रांचे आयोजन करण्यात आले. ध्यान, जप, प्रार्थना आणि उर्जाधारित साधना यांमुळे सहभागी साधकांना आत्मिक समाधान लाभल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान पारंपरिक आणि प्रभावी असे महामृत्युंजय यज्ञ व शिवलिंगावर अभिषेक विधी भक्तिमय वातावरणात पार पडले. इच्छापूर्तीसाठी तपस्वी ब्राह्मणांद्वारे संकल्प करण्यात आले.
यासोबतच उपस्थितांसाठी तज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य सल्ला देण्यात आला. विशेष म्हणजे, ‘हीलिंग साधना’चे परिणाम जाणून घेण्यासाठी पूर्व व पश्चात वैद्यकीय तपासणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात प्रावीण्य मिळविण्यासाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. अनेक पालकांनी आपल्या मुलांसह सहभाग घेतला. सकारात्मक ऊर्जा, मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वासात वाढ झाल्याची प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.
सहभागींनी तणाव व्यवस्थापन, भावनिक संतुलन, झोपेची गुणवत्ता आणि नातेसंबंधांमध्ये सकारात्मक बदल जाणवल्याचे सांगितले. अनेकांनी, “अशी दिव्य साधना आयुष्यात प्रथमच अनुभवायला मिळाली,” असे म्हणत आयोजकांचे आभार मानले.
यावेळी ब्रह्मर्षी आचार्य उपेंद्र जी म्हणाले, योग्य साधना केल्यास आत्ता आणि इथे त्वरित फलश्रुती प्राप्त होते, यालाच खरे अध्यात्म म्हणतात. सामाजिक स्वास्थ्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने अंतर योग फाउंडेशन देशभरात अशा कार्यशाळांचे आयोजन करत असून, तीन कोटी लोकांपर्यंत ही अद्वितीय साधना पोहोचविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, फाउंडेशनची ‘सायन्स ऑफ हीलिंग’ ही संकल्पना विविध राष्ट्रीय संस्थांकडे सादर करण्यात आली असून, पारंपरिक ज्ञानपद्धती आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय साधण्याच्या प्रयत्नांचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
ठाण्यात सकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमानंतर मुंबईत संध्याकाळी आयोजित सत्रालाही मोठ्या संख्येने साधक उपस्थित राहिले. भविष्यातही अशा मोफत आणि सर्वसमावेशक साधना शिबिरांचे आयोजन करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.

