अंबरनाथमध्ये वाहतूक सुधारण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील



नगराध्यक्षा तेजश्री विश्वजीत करंजुळे-पाटील यांनी सविस्तर आढावा घेतला

अंबरनाथ : शहरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर प्रभावी तोडगा काढण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेत वाहतूक पोलीस, नगरपालिका अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांची महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत नगराध्यक्षा तेजश्री विश्वजीत करंजुळे-पाटील यांनी अंबरनाथ शहरातील विद्यमान वाहतूक व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.


विशेषतः अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरातील वाढती गर्दी, वाहनांची मोठ्या प्रमाणावरील वर्दळ, अनधिकृत पार्किंग, फेरीवाल्यांमुळे निर्माण होणारे अडथळे तसेच अरुंद रस्त्यांमुळे होत असलेल्या वाहतूककोंडीच्या समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. नागरिकांना दररोज भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.


बैठकीत शहरातील प्रमुख रस्त्यांचे टप्प्याटप्प्याने रुंदीकरण, सिग्नल व्यवस्था अधिक सक्षम करणे, वाहतूक शिस्तीसाठी जनजागृती मोहीम राबविणे तसेच अंबरनाथ पूर्व व पश्चिम भागातील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या ठिकाणांची तात्काळ पाहणी करून सुधारात्मक उपाययोजना करण्याचे सकारात्मक निर्णय घेण्यात आले.


वाहतूक पोलीस आणि नगरपालिका प्रशासन यांच्यात अधिक समन्वय ठेवून काम करण्यावर विशेष भर देण्यात आला. नागरिकांना सुरक्षित, सुकर आणि नियोजनबद्ध वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्राधान्य असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.


अंबरनाथ शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध आणि सुलभ करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, या निर्णयांची अंमलबजावणी लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सीए तेजश्री विश्वजीत करंजुळे-पाटील यांनी दिली.




Post a Comment

Previous Post Next Post