जूनच्या मध्यावर नव्या मोठ्या नाल्याच्या कामाला तातडीने सुरुवात


डोंबिवली \ शंकर जाधव : डोंबिवलीतील मिलापनगर एमआयडीसी निवासी परिसरातील जीएनपी गॅलेरिया कमर्शियल कॉम्प्लेक्सजवळ एमआयडीसीकडून नव्या मोठ्या नाल्याच्या बांधकामाला तातडीने सुरुवात करण्यात आली आहे. सुमारे दहा फूट रुंदी आणि २०० मीटर लांबीचा हा नाला उभारला जात असून गेल्या आठवड्यापासून युद्धपातळीवर खोदकाम सुरू आहे.

एका प्रमुख लोकप्रतिनिधीच्या बंगल्यासमोरील जीएनपी गॅलेरिया कमर्शियल कॉम्प्लेक्सपासून नंदी पॅलेस हॉटेलपर्यंत हा नाला प्रस्तावित करण्यात आला आहे. कल्याण-शीळ रस्त्यावरील तसेच रस्त्याच्या पलीकडील रिजेन्सी अनंतमसह विविध भागांतून येणारे पावसाचे पूरसदृश पाणी या नव्या नाल्याद्वारे उष्मा पेट्रोल पंप आणि नंदी पॅलेस हॉटेलजवळील विद्यमान नाल्यात सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मिलापनगर परिसरात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, पावसाळ्याच्या तोंडावर आणि जून महिन्याच्या मध्यावर या नाल्याच्या कामाला एवढ्या तातडीने सुरुवात का करण्यात आली, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. येत्या पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल का, याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये साशंकता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, एमआयडीसीकडून नवीन नाले उभारण्याचे काम सुरू असले तरी परिसरातील अनेक जुन्या नाल्यांमधील गाळ आणि कचरा अद्यापही कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून पूर्णपणे काढण्यात आलेला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या समस्येत वाढ होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

यंदा मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला असला, तरी पुढील काही दिवसांत जोरदार पावसाला सुरुवात झाल्यास सुरू असलेल्या कामांमुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post