साडेपाच वर्षांचा दुष्काळ संपला, छत्रपती संभाजीनगरला महापौर मिळाला
भगव्या रंगात न्हावून निघाले मनपा सभागृह, नव्या नेतृत्वापुढे पाणीप्रश्नाचे आव्हान
छत्रपती संभाजीनगर : साडेपाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला महापौर मिळाला. आज पार पडलेल्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाजपचे समीर सुभाष राजूरकर यांची महापौरपदी, तर शिवसेना (शिंदे गट)चे राजेंद्र जंजाळ यांची उपमहापौरपदी निवड झाली. निकाल जाहीर होताच मनपा सभागृहात ‘जय श्रीराम’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय’च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले.
महापालिकेच्या प्रबोधनकार ठाकरे सभागृहात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास निवड प्रक्रिया पार पडली. पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया राबविण्यात आली. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
महापौरपदासाठी महायुतीचे समीर राजूरकर आणि एमआयएमचे अशोक हिवराळे हे दोन उमेदवार रिंगणात होते. हात उंचावून घेतलेल्या मतदानात समीर राजूरकर यांना ७० मते, तर अशोक हिवराळे यांना ३३ मते मिळाली. त्यानंतर उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीचे राजेंद्र जंजाळ यांना ७० मते, तर एमआयएमच्या उमेदवाराला ३३ मते मिळाली.
सकाळपासूनच मनपा परिसरात उत्साहाचे वातावरण होते. भाजप आणि युतीच्या नगरसेवकांनी भगवे फेटे व पोशाख परिधान करत घोषणाबाजी केली, तर विविध पक्षांचे नगरसेवक आपापल्या पक्षचिन्हांनुसार सज्ज झाले होते. निवड प्रक्रियेला प्रारंभ होताच सभागृहात उत्साह शिगेला पोहोचला.
निकाल जाहीर झाल्यानंतर पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या हस्ते नवनिर्वाचित महापौर समीर राजूरकर व उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार संजय केणेकर, आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, नव्या महापौरांसमोर शहरातील पाणीपुरवठा, वाहतूक, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांचा प्रश्न मोठे आव्हान ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मात्र शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्याने काम करण्यात येईल, असा विश्वास नवनिर्वाचित नेतृत्वाने व्यक्त केला आहे.
छत्रपती संभाजीनगर नामांतरानंतर प्रथमच महापौर व उपमहापौरपद युतीकडे आल्याने राजकीय दृष्टिकोनातून या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
