खेळाडूंसाठी मैदाने उपलब्ध करून देण्याबाबत नगराध्यक्षा यांचे ठोस आश्वासन
अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील खेळाडूंना आवश्यक असलेल्या खेळाच्या मैदानांच्या उपलब्धतेबाबत उमेश पाटील, क्रीडा असोसिएशनचे पदाधिकारी व स्थानिक खेळाडूंसोबत सविस्तर बैठक घेण्यात आली. या बैठकीत अंबरनाथ पूर्व व पश्चिम भागातील नगरपालिकेच्या अखत्यारीतील मैदानांबाबत चर्चा करून संभाव्य ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळीतरुण पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी नगरपरिषद सातत्याने कार्यरत राहील, असेही नगराध्यक्षा सीए तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन आखण्यात आले असून, शहरातील मैदानांची संख्या व गुणवत्ता वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. मैदानांच्या अभावामुळे तरुण पिढी नशा व मोबाईलच्या आहारी जात असल्याचे लक्षात घेता, त्यांना क्रीडेकडे वळवण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
याच अनुषंगाने अंबरनाथ पूर्व येथील ग्रीन सिटी मैदान व पश्चिम भागातील चिंचपाडा मैदान येथे हायमास्ट दिवे बसवून सायंकाळच्या वेळेतही सुरक्षित व प्रकाशयुक्त खेळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन नगराध्यक्षा सीए तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील यांनी दिले.


