विद्यार्थ्यांनी आयुष्यात प्रगती करण्यासाठी ध्येय निश्चित करणे महत्वाचे - शर्मिला पिंपळोलकर

 


ठा.म.पा. प्राथमिक शाळांचा दोन दिवसीय क्रीडामहोत्सव संपन्न


दिवा \ आरती परब : ठाणे महानगरपालिका ‍शिक्षण विभाग आयोजित मध्यवर्ती क्रीडा महोत्सव २०२५-२६ च्या बक्षीस वितरण सोहळयादरम्यान बोलताना महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत वरील संदेश दिला. तसेच मिताली संचेती, उपायुक्त (शिक्षण) यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.


काल सचिन तेंडुलकर स्टेडियम, सावरकर नगर येथे संपन्न झालेल्या मध्यवर्ती क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन दिलीप बारटक्के, राकेश शिंदे नगरसेवक ठाणे मनपा व शीतल ढमाले नगरसेविका ठाणे मनपा, मिताली संचेती उपायुक्त (शिक्षण) शेषराव बडे, शिक्षणाधिकारी. आणि कौशिक राजगुरू, राष्ट्रीय पातळीवरील मल्लखांब खेळाडू या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. 


शाळा क्र.१३ व ४१ च्या विद्यार्थिनींनी सुरेल आवाजात ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण झाले. ध्वजाला मानवंदना म्हणून वर्तकनगर गटातील शाळा क्र. १२० व ०३ या शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिस्तबध्द असे संचलन व मानपाडा गटातील शाळा क्र. २५ च्या विद्यार्थ्यांनी रिबिन कवायत तर कळवा गटातील शाळा क्र.६९ व ११५ च्या विद्यार्थ्यांनी डंबेल्स कवायत शिस्तबद्धरित्या सादर केली . किसननगर गटातील शाळा क्र. ३८ व ४२ च्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक लेझीम सादर करून उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर श्रीफळ फोडून मान्यवरांच्या हस्ते कबड्डी च्या सांघिक सामन्याचे उद्घाटन करण्यात आले.


ठाणे महानरगपालिकेच्या एकूण १०२ शाळांमधील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा काही दिवसांपूर्वी झाल्या होत्या. एकूण आठ गटांचे विजयी संघाचे कबड्डी, खो-खो चे अंतिम सामने व वैयक्तिक स्पर्धा क्रिडांगणावर दिवसभरात पार पडल्या. या क्रीडा महोत्सवात शिक्षकांसाठी खोखो च्या स्पर्धा घेण्यात आल्या, हे या क्रीडा महोत्सवाचे वेगळेपण होते.


आज सकाळी याच ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. बक्षीस वितरण समारंभासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, स्थानिक नगरसेवक अनिल भोर, राकेश शिंदे, शितल ढमाले, कांचन चिंदरकर व मिताली संचेती, उपायुक्त शिक्षण हे विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.



याप्रसंगी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी या दिमाखदार कार्यक्रमाच्या आयोजकांचे कौतुक करून सर्व खेळाडूंना प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या. महापौर यांनी स्वतः ठाणे महानगरपालिका शाळा क्र. ३३ च्या विद्यार्थिनी असल्याचा आवर्जून उल्लेख त्यांनी या प्रसंगी केला. उपमहापौर कृष्णा पाटील यांनी विद्यार्थ्याना शाबासकी देत त्यांचे कौतुक केले.      


सदर प्रसंगी ठाणे महानगरपालिका शाळा क्र.२३ इंग्रजी माध्यम च्या विद्यार्थ्यानी तालबद्ध असे मानवी मनोरे ( पिरामिड्स) सादर केले. शाळा क्र. ४४, वर्तकनगर च्या विद्यार्थ्यांनी तालबध्द गीतावर एरोबिक्स सादर करून उपस्थितांची मने जिंकली, तर कोपरी गटातील शाळा क्र. १८ च्या विद्यार्थ्यांनी तालबद्ध लेझीम सादर केले. शाळा क्र. ५३ च्या विद्यार्थ्यांनी लोकनृत्य सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.


 मान्यवरांच्या शुभहस्ते सर्व विजयी संघांना ट्रॉफी आणि बक्षिसे वितरीत करण्यात आली. सदर कार्यक्रमास, प्राथ. ‍शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुनील फापाळे, ठाणे पालघर शिक्षक पतपेढीचे संचालक जगन्नाथ जाधव, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन मा. शिक्षणाधिकारी शेषराव बडे, गटाधिकारी संगीता बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती क्रीडा महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष संतोष दळवी, उपकार्याध्यक्ष सुनील साळुंखे, चिटणीस – रविंद्र सकपाळ, सहचिटणीस – वर्षा मटकर, शेख आफाक अहमद, राजेंद्र बामणे, यूआरसी प्रमुख रविंद्र पाटील, मुश्ताक पठाण व इतर समित्यांचे पदाधिकारी यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले. 


शेवटी मध्यवर्ती क्रीडामहोत्सव समितीचे चिटणीस रविंद्र सकपाळ यांनी सर्वांचे आभार मानले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वजाचे ध्वजावतरण झाले. सविता शिंदे यांच्या वंदे मातारम गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सलग दोन दिवस उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पाटील आणि सविता चौधरी यांनी प्रभावीपणे केले. एकूणच संपूर्ण कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.



Post a Comment

Previous Post Next Post