डोंबिवली \ शंकर जाधव : डोंबिवली ते ठाणे दरम्यान लोकल रेल्वेतील वाढती गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न लक्षात घेता पर्यायी बस सेवा सुरू करण्यासाठी कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) केडीएमटी (KDMT) परिवहन विभागासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
अलीकडेच बारावीच्या परीक्षेला जात असताना गर्दीच्या लोकल प्रवासात एका निष्पाप विद्यार्थ्याचा झालेला दुर्दैवी मृत्यू संपूर्ण डोंबिवलीकरांना हादरवून गेला. या घटनेनंतर सुरक्षित, विश्वासार्ह आणि तातडीचा पर्यायी प्रवास मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे.
या पार्श्वभूमीवर बुधवार, ११ तारखेला केडीएमटी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. लोकल रेल्वेवरील वाढता ताण कमी करणे आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देणे, हा बैठकीचा मुख्य उद्देश होता.
बैठकीतील प्रमुख सूचना
बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांना पुढील बाबींवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
- केडीएमटीमार्फत तातडीने बस सेवा सुरू करावी
- प्रस्तावित मार्गाची त्वरित प्रत्यक्ष पाहणी करावी
- नागरिकांच्या सोयीसाठी लवकरात लवकर बसचे वेळापत्रक निश्चित करावे
प्रस्तावित बस मार्ग
मोठागाव सर्कल – मोठागाव मानकोली ब्रिज – मानकोली – माजिवडा सर्कल – घोडबंदर रोड
हा मार्ग सुरू झाल्यास डोंबिवली ते ठाणे दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून लोकल रेल्वेवरील ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत ही पर्यायी बस सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.

