विकसित भारताचे स्वप्न केवळ जनसहभागातूनच साकार होऊ शकते


केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचे प्रतिपादन 

विविध क्षेत्रांतील ११ मान्यवरांचा जनकल्याण सन्मानाने गौरव


नवी दिल्ली : जन कल्याण मोर्चाच्या वतीने नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या मावळंकर सभागृहात “एक शाम देश के नाम” या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विकसित भारताची संकल्पना जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे आणि राष्ट्रनिर्माणात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या वेळी विविध क्षेत्रांतील ११ मान्यवरांना ‘जनकल्याण सन्मान’ देऊन गौरविण्यात आले.


या कार्यक्रमाला केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी अनेक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, उद्योग क्षेत्रातील मान्यवर, समाजसेवक आणि विचारवंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारंभादरम्यान बॉलीवूड अभिनेता गोविंदा यांना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल आणि लोकप्रियतेच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव निर्माण केल्याबद्दल ‘जनकल्याण सन्मान’ प्रदान करण्यात आला.


उपस्थितांना संबोधित करताना चिराग पासवान म्हणाले की, भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न समाजातील सर्व घटकांच्या सक्रिय सहभागातूनच साकार होऊ शकते. देशाच्या विकासात सामाजिक संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून शिक्षण, आरोग्यसेवा, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांमध्ये त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.


सन्मान स्वीकारताना अभिनेता गोविंदा यांनी आनंद व्यक्त करत हा क्षण आपल्या आयुष्यातील अभिमानाचा असल्याचे सांगितले. चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाजाला सकारात्मक दिशा देण्याची ताकद त्यात आहे, असेही त्यांनी नमूद केले. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात चित्रपटसृष्टीदेखील महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे त्यांनी सांगितले.


रिलायन्स मेड लॅबचे वरिष्ठ अधिकारी प्रदीप दिगे यांना कोविड काळात आरोग्य सेवा आणि समाजासाठी केलेल्या योगदानाबद्दल “विकसित भारत अभियान – आरोग्य क्षेत्र” अंतर्गत सन्मानित करण्यात आले. 


 एक शाम देश के नाम” या कार्यक्रमाचा उद्देश समाजात सकारात्मक बदल घडवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना प्रोत्साहन देणे हा आहे. संस्था गेल्या ३६ वर्षांपासून आरोग्यसेवा, शिक्षण, महिला कल्याण, कौशल्य विकास आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांत कार्यरत आहेत.

डॉ. अशोक चौधरी,राष्ट्रीय अध्यक्ष जन कल्याण मोर्चा



तसेच मुंबईस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकल फाउंडेशनचे कार्यकारी संचालक जयवंत ब्राम्हणे यांचाही आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.


 कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक गणेश वंदनेने झाली. त्यानंतर कथक नृत्य, देशभक्तिपर नाट्यप्रयोग, ‘आझम निझामी ब्रदर्स’ यांचे सुफी गायन आणि उत्साहपूर्ण भांगडा नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली


समारोपावेळी आयोजकांनी सर्व मान्यवर, कलाकार आणि उपस्थितांचे आभार मानत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी अशा सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची मालिका भविष्यातही सुरू राहील, असे सांगितले.



Post a Comment

Previous Post Next Post