बाळूमामांचा रथोत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात


भंडाऱ्याच्या उधळणीत न्हाऊन निघाले आदमापूर

कोल्हापूर \ शेखर धोंगडे : महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील लाखो भाविकांचे परम श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथे सद्गुरु बाळूमामांच्या भंडारा यात्रेचा मुख्य सोहळा रविवारी अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडला. 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'च्या जयघोषात, पारंपारिक वाद्यांच्या गजरात आणि अश्वांच्या नृत्याविष्कारात बाळूमामांचा रथोत्सव संपन्न झाला. विशेष म्हणजे, यंदाची ही भव्य मिरवणूक संपूर्णपणे 'डॉल्बीमुक्त' ठेवून पारंपारिक संस्कृतीचा वारसा जपणारी ठरली.

या सोहळ्याची सुरुवात बाळूमामा देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले यांच्या हस्ते रथाच्या विधिवत पूजनाने झाली. सुमारे पाच तास चाललेल्या या मिरवणुकीत भक्तांनी मुक्तहस्ते भंडाऱ्याची उधळण केली, ज्यामुळे निढोरी ते आदमापूर हा दोन किलोमीटरचा रस्ता पिवळाधमक झाला होता. धनगर बांधवांनी सुमारे एक कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या भव्य रथात बाळूमामांची १३८ किलो वजनाची चांदीची मूर्ती विराजमान होती. हे विलोभनीय रूप डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.


बाळूमामांच्या यात्रेत खिरीच्या महाप्रसादाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मामा स्वतः मेंढ्यांचे दूध महाप्रसादासाठी वापरत असत, तीच परंपरा आजही अखंड सुरू आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या मामांच्या १९ बग्गींमधील (मेंढ्यांचे कळप) दुधाचे कलश निढोरीत एकत्र आणण्यात आले. ग्रामस्थ आणि महिलांनी या कलशांचे औक्षण करून स्वागत केले. वेदगंगेत स्नान करून भाविक निढोरीच्या मारुती मंदिरात जमले आणि तेथून मानाच्या घागरींसह रथाचे आदमापूरकडे प्रस्थान झाले. यावेळी जेसीबीच्या साहाय्याने तब्बल २५ टन भंडाऱ्याची उधळण करण्यात आली, ज्याने आसमंत सुवर्णमयी झाला होता.

या रथोत्सवासाठी कर्नाटक, मुंबई, गोवा, मिरज, पंढरपूर यांसह अनेक ठिकाणांहून दिंड्या दाखल झाल्या होत्या. मार्गावर काढलेल्या नक्षीदार रांगोळ्या, फुलांची पखरण आणि टाळ-मृदंगाच्या गजराने भक्तीचा पूर ओसंडून वाहत होता. यात्रेकरूंसाठी निढोरी आणि आदमापूर येथील सेवाभावी कार्यकर्त्यांमार्फत खिचडी, फळे, ताक आणि सरबताचे मोफत वाटप करण्यात आले. सोमवारी द्वादशीच्या दिवशी मानाच्या घागरीतील दुधाने मामांच्या समाधीला अभिषेक घातला जाणार असून, उर्वरित दुधाचा वापर महाप्रसादासाठी केला जाणार आहे.



Post a Comment

Previous Post Next Post