सुपर एल निनोमुळे तापमान ४० अंशांच्या पुढे
नवी मुंबई : रायगड जिल्ह्यात तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने प्रशासनाने उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार, ‘सुपर एल निनो’ या हवामान घटनेच्या परिणामामुळे २०२६ हे वर्ष देशातील सर्वाधिक उष्ण वर्षांपैकी एक ठरू शकते.
समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानात वाढ झाल्याने हवामानाच्या पॅटर्नमध्ये बदल होण्याची शक्यता असून, याचा परिणाम मान्सूनवरही होऊ शकतो. काही भागांत तापमान ४५ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आयएमडीच्या निकषानुसार किनारी भागात सलग दोन दिवस कमाल तापमान ३७ अंशांपेक्षा जास्त राहिल्यास ‘हीटवेव्ह’ घोषित केली जाते. सरासरीपेक्षा ४.५ ते ६.४ अंशांनी वाढ झाल्यास उष्णतेची लाट, तर ६.५ अंशांपेक्षा जास्त वाढ झाल्यास ‘तीव्र उष्णतेची लाट’ मानली जाते, जी जीवघेणी ठरू शकते.
प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून, उष्माघात ही वैद्यकीय आपत्कालीन स्थिती असल्याचे स्पष्ट केले आहे. शरीराचे तापमान अत्यंत वाढणे, घाम न येणे, चक्कर येणे, डोकेदुखी, मळमळ, त्वचा कोरडी व लालसर होणे, तीव्र तहान, लघवी कमी होणे तसेच मुलांमध्ये चिडचिड किंवा आळस ही लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.
नागरिकांनी दररोज किमान ३ ते ४ लिटर पाणी पिणे, लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारख्या नैसर्गिक पेयांचे सेवन करणे, हलकी सूती कपडे परिधान करणे आणि दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच टोपी, स्कार्फ, सनग्लासेसचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले. जड, प्रथिनयुक्त व मांसाहारी अन्न टाळावे तसेच उघड्यावर ठेवलेले किंवा शिळे अन्न खाऊ नये. मद्यपान, कॅफिनयुक्त पेये आणि कार्बोनेटेड ड्रिंक्स टाळण्याचाही सल्ला देण्यात आला आहे, कारण यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता वाढू शकते.
घरात थंडावा राखण्यासाठी दिवसा पडदे लावणे, रात्री योग्य वायुवीजन ठेवणे आणि विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. तसेच सामाजिक जबाबदारी म्हणून पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी आणि पाळीव प्राण्यांना सावलीत ठेवून त्यांना पुरेसे पाणी द्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. पर्यावरणीय घटकांमुळेही उष्णतेची तीव्रता वाढत असल्याचे प्रशासनाने नमूद करत औद्योगिकीकरण व वृक्षतोड यावर नियंत्रण ठेवण्याची गरज अधोरेखित केली आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी किंवा १०८ या रुग्णवाहिका सेवेला संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
