कोल्हापूर / शेखर घोंगडे : महामानव, परमपूज्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बिंदू चौकातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अभिवादन केले. यावेळी आमदार जयंत आसगावकर, महापौर रूपाराणी निकम, मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जस्मिन, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपायुक्त परितोष कंकाळ, उपमहापौर अक्षय जरग, साळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री आबिटकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांमुळे भारतीय समाजाला नवी दिशा मिळाली असून लोकशाहीची पायाभरणी अधिक मजबूत झाली आहे. समाजपरिवर्तनासाठी महापुरुषांनी दिलेल्या विचारांचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
डॉ. आंबेडकर यांच्या कार्यामुळे समाजात समानता आणि न्यायाची भक्कम पायाभरणी झाली. माणसाला माणूस म्हणून सन्मानाने जगता यावे तसेच अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांनी समाजाला दिली आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वाभिमानाची जाणीव निर्माण केली, असेही त्यांनी नमूद केले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी डॉ. आंबेडकर यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून ते विसरता येणार नाही, असे महापौर रूपाराणी निकम यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांनीही समयोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलीस बँड पथकाने सादरीकरण केले. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींनी “जागर संविधानाचा” हे पथनाट्य सादर केले. यावेळी प्रतीकात्मक स्वरूपात काही विद्यार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, राजीव आवळे, वसंतराव मुळीक, विजय देवणे, कादर मलबारी, राजेश लाटकर, डी. जी. भास्कर यांच्यासह हजारो भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मध्यवर्ती संयोजन समितीने उत्तमरीत्या केले.


