१ मेपासून सोलापूर, मंगळुरू, बागडोगरासाठी थेट सेवा
पुणे : पुणे विमानतळावरून १५ नवीन उड्डाणांना मंजुरी मिळाली असून, महाराष्ट्र दिन (१ मे) पासून सोलापूर, मंगळुरू आणि बागडोगरा या शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली. या नव्या उड्डाणांमुळे पुण्याची हवाई जोडणी अधिक मजबूत होणार असून पर्यटन आणि व्यापार क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या पुणे विमानतळावरून दररोज सुमारे २२० विमानांची ये-जा होत होती. नव्या १५ उड्डाणांना मंजुरी मिळाल्याने ही संख्या १ मेपासून २३५ वर जाणार आहे. उड्डाणांमध्ये झालेल्या या वाढीमुळे नवीन हवाई मार्ग सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
केंद्र सरकारच्या ‘उडाण’ (UDAN) योजनेअंतर्गत देशातील प्रादेशिक हवाई संपर्क वाढवण्यावर भर दिला जात असून, त्याचाच एक भाग म्हणून पुणे विमानतळावरून मंगळुरू, सोलापूर आणि बागडोगरा या शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू केली जात आहे. याआधी नांदेड, किशनगड, सिंधुदुर्ग आणि जळगाव या शहरांसाठी थेट सेवा उपलब्ध आहे. नवीन हवाई मार्गांमुळे पुणे परिसराचा दक्षिण आणि ईशान्य भारताशी थेट संपर्क वाढणार आहे. त्यामुळे देशांतर्गत पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच स्थानिक बाजारपेठांमधील मागणी वाढण्याची शक्यता आहे, असेही ढोके यांनी नमूद केले.
पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीमुळे प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचे नियोजन अधिक सुलभ झाले आहे. तसेच, प्रवासीसंख्या लक्षात घेऊन विमानतळावरील पायाभूत सुविधांचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात येत आहे. यामुळे भविष्यात आणखी उड्डाणे वाढविण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादाचा विचार करून आगामी काळात विमानउड्डाणांची संख्या आणखी वाढवण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उड्डाणांचा आढावा:
- सध्याची उड्डाणे : २२०
- नव्या उड्डाणांना मंजुरी : १५
- १ मेपासून एकूण उड्डाणे : २३५
नवीन वेळापत्रक १ मेपासून लागू होणार असून, प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
