गोकुळच्या रणांगणात महायुतीची एंट्री


 ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’ची घोषणा

कोल्हापूर / शेखर धोंगडे :  सहकार क्षेत्रासह कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोल्हापूर येथील रेसिडेन्सी क्लबमध्ये शनिवारी दुपारी झालेल्या महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत सर्व मतभेद बाजूला सारत ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’ची अधिकृत घोषणा करण्यात आली.

बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉ. विनय कोरे-सावकार, आमदार अमल महाडिक तसेच जनसुराज्य युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष समिती कदम यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती आणि आघाडीची भूमिका निश्चित करण्यात आली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार डॉ. विनय कोरे-सावकार यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती. निवडणूक नियोजनाबाबत सर्व नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून महायुती एकसंघपणे निवडणुकीला सामोरी जाणार आहे. मधल्या काळात काही स्थानिक कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे महायुती एकत्र येणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आजच्या बैठकीनंतर त्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून महायुती पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या एकजुटीचा जिल्ह्यातील राजकारणावर सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी यापूर्वीच विरोधी ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी’ ची घोषणा करून मोर्चेबांधणी पूर्ण केली आहे. त्यामुळे आता गोकुळ दूध संघाच्या सत्तेसाठी महायुतीच्या ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’ आणि सतेज पाटील यांच्या ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी’ यांच्यात थेट आणि चुरशीची लढत रंगण्याची चिन्हे आहेत.
या दोन बलाढ्य आघाड्या आमनेसामने आल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, राज्याचे लक्ष आता गोकुळ दूध संघाच्या या हायव्होल्टेज निवडणुकीकडे लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post