प्रेमा रावतला भारतीय संघात संधी
लीड्स : महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारतीय संघाला मोठा धक्का बसला असून ऑफ-स्पिनर श्रेयंका पाटील पायाच्या घोट्याच्या दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडली आहे. तिच्या जागी अनकॅप्ड लेगस्पिनर प्रेमा रावतचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
बुधवारी नेदरलँड्सविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने ९५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र, या सामन्यादरम्यान २३ वर्षीय श्रेयंका पाटील दुखापतग्रस्त झाली. पॉवरप्लेच्या अखेरच्या षटकात चेंडू अडविण्याच्या प्रयत्नात तिचा घोटा पिळवटला. दुखापतीनंतर ती मैदानावरच वेदनेने बसली होती. संघाच्या फिजिओने तातडीने मैदानात धाव घेतली. केवळ एक चेंडू टाकल्यानंतरच तिला पायावर वजन देणे अशक्य झाल्याने स्ट्रेचरच्या साहाय्याने मैदानाबाहेर नेण्यात आले.
'आयसीसी' महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक २०२६ च्या तांत्रिक समितीने श्रेयंका पाटीलच्या जागी प्रेमा रावतच्या नावाला मंजुरी दिली असल्याची माहिती 'आयसीसी'ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.
२४ वर्षीय प्रेमा रावतला प्रथमच वरिष्ठ भारतीय संघातून खेळण्याची संधी मिळाली आहे. तिने महिला प्रीमियर लीगच्या दोन हंगामांत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाकडून एकूण सहा सामने खेळले असून आता विश्वचषकाच्या रंगमंचावर स्वतःची छाप पाडण्याची संधी तिच्यासमोर उभी ठाकली आहे.


