दिवा \ आरती परब : दिवा, मुंब्रा, कळवा, डोंबिवली आणि परिसरातील लाखो रेल्वे प्रवाशांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळावा तसेच दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) थेट लोकल सेवा सुरू करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने दिवा रेल्वे स्थानक परिसरात भव्य स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. या अभियानाला रेल्वे प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत आणि कल्याण जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत यांच्या नेतृत्वाखाली, कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख ॲड. रोहिदास मुंडे व दिवा शहरप्रमुख सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान पार पडले.
दिवा परिसरातील रेल्वे प्रवाशांना दररोज प्रचंड गर्दी, अपुऱ्या लोकल फेऱ्या, जीवघेणा प्रवास आणि विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः दिवा ते सीएसएमटी थेट लोकल सेवा नसल्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त गर्दीचा सामना करावा लागतो. तसेच कल्याण ते घाटकोपर दरम्यान सकाळी ५ वाजल्यापासून आणि सायंकाळी ६ वाजल्यानंतर लोकल गाड्यांची संख्या अपुरी पडत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
या पार्श्वभूमीवर दिवा ते सीएसएमटी थेट लोकल सेवा सुरू करणे, तसेच गर्दीच्या वेळेत उपनगरीय लोकल फेऱ्यांची संख्या वाढविणे या मागण्यांसाठी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या संकलित करण्यात आल्या. अभियानादरम्यान अनेक प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त करत तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.
अभियानातून संकलित करण्यात आलेल्या हजारो स्वाक्षऱ्या रेल्वे प्रशासन तसेच केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणार असून, रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांवर न्याय मिळेपर्यंत शिवसेनेचा लढा सुरूच राहील, असा निर्धार यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेनेचे विविध पदाधिकारी, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेना कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
"एक स्वाक्षरी लाखो प्रवाशांच्या हक्कासाठी" या घोषवाक्याखाली पार पडलेल्या या अभियानामुळे दिवा परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या दीर्घकालीन समस्यांकडे पुन्हा एकदा प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.
