आमदार, नगरसेवकांच्या उपस्थितीत बेतवडेवासीयांचे आंदोलन स्थगित


शेतकऱ्यांच्या मागण्यांना बिल्डरची मान्यता

दिवा \ आरती परब : बेतवडे गावातील जमीन विकास कराराशी संबंधित मोबदला गेल्या दहा वर्षांपासून मिळाला नसल्याचा आरोप करत शेतकरी व भूमिपुत्रांनी मॅरेथॉन नेक्सवर्ल्ड प्रकल्पाच्या कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन अखेर १३ व्या दिवशी स्थगित करण्यात आले. मॅरेथॉनचे बिल्डर मयूर रमणिक शहा यांनी आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांना मान्यता दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

शुक्रवार, १० जुलैपासून सुरू झालेल्या या आंदोलनाला दिवा, डोंबिवली आणि कल्याण परिसरातील विविध सामाजिक संघटना, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. शेतकऱ्यांच्या मागण्या न्याय्य असल्याचे मत व्यक्त करत अनेकांनी आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.

आंदोलन स्थगित करण्यासाठी आमदार राजेश मोरे तसेच दिव्यातील सर्व नगरसेवकांनी पुढाकार घेत आंदोलक, प्रशासन आणि बिल्डर यांच्यात समन्वय साधला. पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनानेही या प्रश्नावर सहकार्याची भूमिका घेतल्याचे आंदोलकांनी सांगितले.

दरम्यान, दिवा शहर शिवसेना प्रमुख तथा नगरसेवक रमाकांत मढवी यांनी सोमवारी झालेल्या महापालिकेच्या महासभेत बेतवडे गावातील भूमिपुत्रांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली होती. मॅरेथॉनचे बिल्डर मयूर रमणिक शहा यांच्याविरोधात स्टॉप वर्क नोटीस बजावण्याची तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली होती. याशिवाय, बिल्डरची चूक असल्यास महापालिका प्रशासन कारवाई करणार का, असा थेट सवालही त्यांनी प्रशासनाला केला होता.

या प्रश्नावर लोकप्रतिनिधींच्या वाढत्या दबावानंतर ठाणे महापालिका प्रशासनही सक्रिय झाले. अखेर आंदोलकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाल्याने गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन आज स्थगित करण्यात आले.

आंदोलन स्थगित झाल्यानंतर भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच मंजूर झालेल्या मागण्यांची अंमलबजावणी वेळेत व्हावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post