प्रवाशांच्या न्याय हक्कासाठी तुषार पाटीलचा उपक्रम
दिवा, (आरती मुळीक परब) : दिव्यातील सर्वसामान्य प्रवाशांच्या समस्यांवर, प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी दिवा शहर मनसेचे अध्यक्ष तुषार पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष विरहित दिवा प्रवासी संघटना स्थापन केली जाणार आहे.
दिवा शहरातील सर्व सामान्य रिक्षा प्रवासी, बस प्रवासी व रेल्वे प्रवाशांना वारंवार अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो. शहरात आरटीओ नियमांच्या पलीकडे जाऊन होणारी रिक्षा भाडेवाढ, रेल्वेच्या समस्या, त्याचबरोबर बस प्रवाशांना नसलेला बस निवारा या संदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी संपूर्ण दिवा शहरातील सर्वसामान्य प्रवाशांचे प्रतिनिधित्व करणारी दिवा प्रवासी संघटना स्थापन केली जाणार असल्याचे दिवा मनसेचे अध्यक्ष तुषार पाटील यांनी सांगितले.
सकाळच्यावेळी जीवावर उदार होऊन दिवेकरांना लटकत रेल्वेतून प्रवास करावा लागत आहे. तर दिव्यात राहणारे हे मध्यमवर्गीय नागरिक या रिक्षांच्या भाडेवाढीमध्ये भरडले जात आहेत. समस्या तेथेच असून त्याकाही सुटत नसल्याते दिसत असल्याने या प्रवासी संघटनेत दिवा शहरातील नागरिकांनी सहभागी होऊन ही संघटना मजबूत करावी, असे आवाहन ही तुषार पाटील यांनी केले आहे.