मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील आरक्षण क्रमांक १२२ वरील दोन अनधिकृत धार्मिक स्थळांच्या अतिक्रमणांवर रविवारी महानगरपालिकेने नियमानुसार तोडक कारवाई केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या ५ मे २०११ रोजीच्या निर्णयान्वये जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, आरक्षण क्रमांक १२२ हा भूखंड सामाजिक वनीकरण आणि खेळाच्या मैदानासाठी आरक्षित आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या दोन अनधिकृत धार्मिक स्थळांच्या बांधकामांबाबत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच कारवाई करण्यात आली.
प्रशासनाने ही कारवाई अत्यंत संवेदनशीलतेने, शिस्तबद्ध नियोजनाद्वारे आणि कायद्याच्या चौकटीत राहून राबविली. कारवाईदरम्यान कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत तसेच सामाजिक आणि धार्मिक सलोखा अबाधित राहील याची विशेष खबरदारी घेण्यात आली. त्यामुळे संपूर्ण कारवाई शांततेत आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता यशस्वीरीत्या पूर्ण झाली.
ही कारवाई मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मीरा--भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांच्याकडून आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांच्या समन्वयातून ही कारवाई सुरळीतपणे पार पडल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. आरक्षित जागांवरील अतिक्रमणे हटवून त्या जागांचा नियोजित उद्देशासाठी वापर सुनिश्चित करण्यासाठी भविष्यातही अशा कारवाया सुरू राहतील, असे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

