समाजसेवेच्या उपक्रमांना मिळणार नवी गती
दिवा \ आरती परब : रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणेच्या अध्यक्षपदी गणेश तावरे यांनी नुकताच पदभार स्वीकारला. प्रांतपाल डॉ. निलेश जयवंत यांच्या हस्ते झालेल्या पदग्रहण सोहळ्यात माजी अध्यक्ष किशोर पाटील यांनी आपल्या कार्यकाळातील विविध समाजोपयोगी उपक्रमांचा आढावा घेत नवीन अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.
किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखालील रोटरी वर्षात दिवा शहरात तब्बल ३२ ते ३३ विविध सामाजिक प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आले. रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, गरजू नागरिकांना मदत, तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना सायकल वाटपासारख्या उपक्रमांद्वारे क्लबने समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. रोटरीच्या ‘सेवा हीच श्रेष्ठता’ या तत्त्वाचा प्रत्यय त्यांच्या कार्यकाळात विविध उपक्रमांतून आला.
यावेळी क्लबमध्ये दोन नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला. दिवा परिसरातील लोकप्रिय नगरसेवक शैलेश पाटील आणि परेश म्हात्रे यांचे विशेष सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. शैलेश पाटील हे सध्या तिसऱ्या कार्यकाळातील नगरसेवक असून सामाजिक आणि लोकहिताच्या कार्यांमुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
शैलेश पाटील यांच्यासारख्या अनुभवी आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वाचा क्लबमध्ये समावेश झाल्याने आगामी काळातील समाजसेवी उपक्रमांना नवी ऊर्जा आणि बळ मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
नवीन अध्यक्ष गणेश तावरे यांनी आपल्या मनोगतात रोटरीच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. दिवा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच गरजू आणि वंचित घटकांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्याची ग्वाही त्यांनी दिली.
या पदग्रहण सोहळ्यास रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य, मान्यवर नागरिक तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक व्यक्ती उपस्थित होत्या. नवीन नेतृत्वाखाली रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे समाजसेवेची परंपरा अधिक व्यापकपणे पुढे नेईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

