लंडनमध्ये ७७ जणांना अटक ; १,२०० हून अधिक जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल
लंडन : ब्रिटन सरकारने दहशतवादी संघटना म्हणून बंदी घातलेल्या 'पॅलेस्टाईन ॲक्शन' या संघटनेच्या समर्थनार्थ लंडनमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी ७७ जणांना अटक केली.वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयाबाहेर जमलेल्या आंदोलनकर्त्यांनी, "मी नरसंहाराला विरोध करतो, मी पॅलेस्टाईन ॲक्शनला पाठिंबा देतो," अशा घोषणा दिल्या. त्यानंतर मेट्रोपॉलिटन पोलिसांनी कारवाई करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांपैकी बहुतांश जणांवर बंदी घालण्यात आलेल्या संघटनेला पाठिंबा दर्शवल्याचा आरोप आहे.
ब्रिटनमध्ये 'पॅलेस्टाईन ॲक्शन'वर बंदी घातल्यानंतर केवळ "मी पॅलेस्टाईन ॲक्शनला पाठिंबा देतो" असे फलक हातात धरल्याप्रकरणीही आतापर्यंत ३ हजारांहून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी १,२०० हून अधिक जणांविरुद्ध दहशतवाद प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र, अद्याप या प्रकरणांमध्ये कोणालाही दोषी ठरविण्यात आलेले नाही.
ब्रिटन सरकारने जून २०२५ मध्ये 'पॅलेस्टाईन ॲक्शन'वर बंदी घातली होती. त्यापूर्वी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गाझामधील इस्रायलच्या लष्करी कारवाईला ब्रिटनकडून मिळणाऱ्या कथित समर्थनाच्या निषेधार्थ रॉयल एअर फोर्सच्या तळात घुसून आंदोलन केले होते.
या बंदीविरोधात संघटनेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने फेब्रुवारीमध्ये ही बंदी रद्द केली होती. मात्र, जूनमध्ये अपील न्यायालयाने सरकारची भूमिका योग्य आणि प्रमाणबद्ध असल्याचे सांगत बंदी कायम ठेवली. न्यायालयाने नमूद केले की, संघटना केवळ शांततापूर्ण नागरी अवज्ञेपुरती मर्यादित न राहता मालमत्तेचे नुकसान करणे आणि व्यक्तींना इजा पोहोचविणाऱ्या हिंसक कृतींमध्ये सहभागी झाली होती.
दरम्यान, ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी 'पॅलेस्टाईन ॲक्शन'च्या संस्थापक हुडा अम्मोरी यांना या बंदीविरोधात अपील दाखल करण्याची परवानगी दिली. या प्रकरणाची सुनावणी ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान होण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत या बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या सर्व खटल्यांवरील सुनावणी स्थगित ठेवण्यात आल्याची माहिती न्यायालयीन अधिकाऱ्यांनी दिली.
