मुंबई : दूध उत्पादकांच्या वाढत्या उत्पादन खर्चामुळे मुंबई आणि परिसरात दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. १ सप्टेंबरपासून घाऊक दूध दरात प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ होणार असून, सध्याचा ९३ रुपयांचा दर आता १०२ रुपये प्रतिलिटर होणार आहे. या निर्णयाचा परिणाम आगामी काळात किरकोळ दूध दरावरही होण्याची शक्यता आहे.
मुंबई मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत दरवाढीचा निर्णय एकमताने घेण्यात आला. दूध देणाऱ्या जनावरांच्या किमती वाढण्याबरोबरच पशुखाद्य आणि चाऱ्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने दूध उत्पादन खर्च वाढल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
दाना, तूर चुनी, हरभरा चुनी यांसारख्या पशुखाद्याच्या दरात सुमारे २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तसेच गवत, पिंडा आणि अन्य चाऱ्याच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांना वाढता खर्च भागविणे कठीण होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
यापूर्वी फेब्रुवारी २०२६ मध्ये दूध दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर वाढलेला उत्पादन खर्च उत्पादकांनी काही काळ स्वतः सहन केला. मात्र, खर्च सातत्याने वाढत असल्याने आता दर सुधारण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
मुंबईत प्रमुख डेअऱ्यांकडून गायीचे दूध सध्या साधारण ५७ ते ६० रुपये प्रतिलिटर दराने विकले जाते. स्थानिक किंवा सुटे दूध सुमारे ६५ ते ७० रुपये प्रतिलिटर दराने मिळते. मुंबईत दररोज अंदाजे ४० ते ४५ लाख लिटर दुधाचा वापर होत असल्याचे सांगितले जाते.
