बंदींच्या मनगटावर राखी बांधून दिला मायेचा आधार
ठाणे : “भिंती कारागृहाच्या असल्या, तरी प्रेमाच्या नात्यांना कोणत्याही भिंती नसतात,” या भावनेतून ठाणे मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधनाचा सण भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. विविध सामाजिक व सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींनी कारागृहातील बंद्यांना राखी बांधून बंधुभाव, प्रेम, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे डॉ. सुहास वारके यांच्या प्रेरणेने तसेच विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जीवन विद्या मिशन, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, ठाणे, सेवाधाम कम्युनिटी सर्विस असोसिएशन आणि संस्कार सेवाभावी संस्था, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. संस्थांच्या प्रतिनिधींनी बंद्यांच्या मनगटावर राखी बांधत त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला. यावेळी अनेक बंद्यांच्या चेहऱ्यावर भावूकता दिसून आली.
कारागृहातील जीवन शिस्त, नियम आणि बंधनांनी व्यापलेले असले तरी बंद्यांच्या भावभावना तितक्याच जिवंत असतात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणीचे प्रेम, माया आणि कुटुंबीयांच्या आठवणी जाग्या होत असल्याने अशा उपक्रमातून त्यांना भावनिक आधार मिळतो. राखीचा धागा हा केवळ मनगटावर बांधला जाणारा धागा नसून विश्वास, प्रेम, जबाबदारी आणि नात्यांची आठवण करून देणारा भावबंध असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कारागृह प्रशासनाच्या वतीने सामाजिक आणि सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून सण-उत्सवांचे आयोजन करण्यात येते. अशा उपक्रमांमुळे बंद्यांमध्ये सकारात्मक विचार निर्माण होण्यास, माणुसकीची भावना जपण्यास तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा सहभागी होण्याची प्रेरणा मिळण्यास मदत होत असल्याचे प्रशासनाने सांगितले.
कारागृहाच्या विक्री केंद्रात राख्यांसह विविध वस्तू उपलब्ध
रक्षाबंधनाच्या निमित्ताने ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या विक्री केंद्रात बंद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये रंगीबेरंगी राख्या, लाकडी व लोखंडी वस्तू, शोपीस, दऱ्या, आसनपट्टी, कपडे, टॉवेल आदी वस्तूंचा समावेश आहे.
हे विक्री केंद्र सर्व नागरिकांसाठी सकाळी ८.३० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुले ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी या वस्तूंची खरेदी करून बंद्यांच्या पुनर्वसनाच्या प्रयत्नांना हातभार लावावा, असे आवाहन ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक राणी रा. भोसले यांनी केले आहे.


