२५ हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार ; वर्षा मॅरेथॉनच्या टीझरचे लोकार्पण
ठाणे : ‘धाव प्रगतीची, गतिशील ठाण्याची’ या घोषवाक्याखाली ३२ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मॅरेथॉनमध्ये २५ हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार आहेत.
प्रशासकीय राजवटीनंतर प्रथमच होत असलेल्या या महापौर वर्षा मॅरेथॉनकडे केवळ स्पर्धा म्हणून नव्हे, तर ठाणे शहराच्या क्रीडा संस्कृतीचा भव्य उत्सव म्हणून पाहिले जात आहे. शालेय विद्यार्थी, तरुण, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांसह विविध वयोगटातील नागरिकांना या मॅरेथॉनमध्ये सहभागी होता येणार आहे.
महापालिका मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदपूर्वी ३२ व्या महापौर वर्षा मॅरेथॉनच्या टीझरचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अभिनेते नीलेश साबळे आणि आदिनाथ कोठारे यांच्या उपस्थितीत स्पर्धकांना देण्यात येणाऱ्या टी-शर्ट तसेच मॅरेथॉनच्या सन्मानचिन्हांचे अनावरण करण्यात आले.
यावेळी नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल संख्ये, उथळसर प्रभाग समिती अध्यक्ष नारायण पवार, दिवा प्रभाग समिती अध्यक्ष दीपक जाधव, शिवसेना गटनेते पवन कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते (श.प.) अभिजीत पवार, नगरसेवक बाबाजी पाटील, अतिरिक्त आयुक्त-१ मनीष जोशी, अतिरिक्त आयुक्त-२ प्रशांत रोडे, उपायुक्त मीनल पालांडे, अभिनेते व निर्माता मंगेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, २५ हजारांहून अधिक धावपटू सहभागी होणार असल्याने मॅरेथॉन मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. मार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश देण्यात आले असून, धावपटूंना सुरक्षित आणि सुरळीत मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी दिली.
शालेय विद्यार्थ्यांना मॅरेथॉनच्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी परिवहन विभागाच्या बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहभागालाही मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मॅरेथॉनचा उत्साह वाढवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘धावूया प्रगतीसाठी, धावूया आरोग्यासाठी आणि धावूया गतिशील ठाण्यासाठी’, असा संदेश देत शहराच्या क्रीडा आणि आरोग्य संस्कृतीला चालना देण्याचा संकल्प या मॅरेथॉनच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे.



