दिव्यात पाणी माफियांवर महापालिकेची धडक कारवाई


६१ पंप जप्त; ३०० मिमी जलवाहिनीवरील अनधिकृत जोडण्या खंडित

दिवा \ आरती परब : दिवा गाव आणि दिवा पश्चिम परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या ३०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर करण्यात आलेल्या अनधिकृत नळजोडण्यांवर अखेर महापालिकेच्या पाणी विभागाने धडक कारवाई केली. या कारवाईत पाणी खेचण्यासाठी वापरण्यात येणारे तब्बल ६१ वॉटर पंप मशीन जप्त करण्यात आले. तसेच बेकायदा जोडण्या खंडित करण्यात आल्या.


दिवा प्रभाग क्रमांक २७ मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत असल्याची तक्रार नगरसेवक ॲड. आदेश भगत यांनी दिवा प्रभाग समितीच्या पाणी विभागाकडे केली होती. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात पाणी चोरी होत असलेल्या विविध ठिकाणांचा उल्लेख करून संबंधित ठिकाणी तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पाणी विभागाने बुधवारी कारवाई केली.


दिवा पूर्वेतील साबेगाव रोडवरील सिद्धार्थ पार्कजवळील साईबाबा मंदिराच्या मागील बाजूस तसेच रेशनिंग कार्यालयाजवळ पाणी विभागाच्या पथकाने कारवाई केली. या ठिकाणी मुख्य जलवाहिनीवर बेकायदा कनेक्शन करून पाणी चोरी केली जात असल्याचे निदर्शनास आले. पाणी खेचण्यासाठी मोठ्या क्षमतेचे पंप वापरले जात होते. काही ठिकाणी या पंपांसाठी स्वतंत्र खोलीदेखील उभारण्यात आल्याचे सांगण्यात आले. या कारवाईदरम्यान एकूण ६१ पंप मशीन ताब्यात घेण्यात आली, तर अनधिकृत जलजोडण्या खंडित करण्यात आल्या.


दिवा परिसरात पाणी मुबलक उपलब्ध असतानाही अनधिकृत जोडण्या आणि पंपांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी खेचले जात असल्यामुळे दिवा गावात अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे ॲड. आदेश भगत यांनी सांगितले.


अनधिकृतरीत्या पाणी खेचून सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी रोज पाणी हवे असल्यास १२ हजार रुपये, तर एक दिवसाआड पाणी हवे असल्यास ६ हजार रुपये मागितले जात असल्याच्या तक्रारीही आपल्याकडे आल्याचे भगत यांनी सांगितले. त्यामुळे पाणी चोरीला आळा घालून नागरिकांना नियमित आणि पुरेशा दाबाने पाणी मिळावे, यासाठी पाठपुरावा सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


“दिवा परिसरात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या अनधिकृत जोडण्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. नागरिकांना पाणीपुरवठ्याबाबत अडचणी असल्यास त्यांनी नगरसेवकांच्या कार्यालयात तक्रार करावी किंवा दिवा प्रभाग समितीतील पाणी विभागाशी संपर्क साधून अधिकृत जलवाहिनीची मागणी करावी,” असे आवाहन नगरसेवक ॲड. आदेश भगत यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post