किल्ले दुर्गाडी नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

 


११ ते २० ऑक्टोबरदरम्यान उत्सव; पाच लाख भाविकांच्या व्यवस्थेचे नियोजन

कल्याण | शंकर जाधव
MAHARASHTRA WEBNEWS

किल्ले दुर्गाडी येथे ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान शारदीय नवरात्रोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या पूर्वतयारी आणि नियोजनासाठी मंगळवारी किल्ले दुर्गाडी येथे देवस्थान नवरात्रोत्सव समिती आणि प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

किल्ले दुर्गाडी देवस्थान नवरात्रोत्सव समितीचे अध्यक्ष रवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

नवरात्रोत्सवाच्या काळात किल्ले दुर्गाडी येथे सुमारे पाच लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असल्याने गर्दीचे नियोजन आणि भाविकांच्या सुरक्षिततेला बैठकीत प्राधान्य देण्यात आले. वाहतूक व्यवस्था, किल्ल्यावरील नागरी सुविधा, वीज, पाणी, स्वच्छता, वैद्यकीय सेवा तसेच आपत्कालीन परिस्थितीतील उपाययोजनांबाबत संबंधित विभागांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी विविध शासकीय यंत्रणांमध्ये योग्य समन्वय ठेवण्याचे निश्चित करण्यात आले. प्रशासनाने आवश्यक उपाययोजना वेळेत पूर्ण करून भाविकांना सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात देवीचे दर्शन घेता यावे, यासाठी संबंधित विभागांनी परस्पर सहकार्याने काम करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.


पाच दशकांची परंपरा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बंदी हुकूम मोडल्यानंतर किल्ले दुर्गाडी येथे सुमारे ५० ते ५५ वर्षांपासून नवरात्रोत्सवाची परंपरा सुरू असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. किल्ल्याचा जीर्णोद्धारही करण्यात आला आहे.

यंदाच्या उत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती किल्ले दुर्गाडी देवस्थान नवरात्रोत्सव समितीचे अध्यक्ष तथा शिवसेना कल्याण शहरप्रमुख रवी पाटील यांनी दिली.

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन सुरक्षा, वाहतूक आणि मूलभूत सुविधांबाबत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रशासनाने आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post